कुटुंबाचा आधार हरवला, बसच्या धडकेत पिता, पुत्री ठार

देवरी: : भरधाव येणार्‍या प्रवासी खाजगी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार पिता व मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 14 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास महामार्ग क्रमांक 53 वर देवजीटोला पुलाजवळ घडली. सुरजलाल वासाके (33) व वेदिका सुरजलाल वासाके (7) रा. देवरी अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. यावेळी अपघाताला कारणीभूत अग्रवाल ग्लोबल कंपनीविरोधात संताप करून आंदोलन केले. यावेळी चार तास मार्गावर वाहतुक कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढून वाहतुक सुरळीत केली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर बाम्हणी-खडकी गावाजळ महामार्गाचे काम सुरू आहे. कामाचे कंत्राट अग्रवाल ग्लोबल कंपनीला आहे. बांधकामासाठी रस्ता खोदून ठेवला आहे. येथून एकेरी वाहतुक सुरू आहे. गत तीन दिवसांत तिसरा अपघात आहे. कंपनीने येथे सुरक्षेच्या दृष्टिने कोणतीही उपाय योजना केली नाही. घटनेच्या दिवसी सुरजलाल वासाके मुलगी वेदीकासह दुचाकी क्रमांक एमएच 35 टी 8624 ने कोहमाराकडून स्वगावी देवरीकडे जात असताना देवरीच्या दिशेने भरधाव जाणारी ट्रॅव्हल्स क्रमांक सीजी 16 एफ 0326 ने दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात दुचाकीस्वार सुरजलाल व वेदीकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती ब्राह्मणी खडकी परिसरातील जनतेला होताच त्यांनी अपघातस्थळ गाठून कंपनीविरोधात आंदोलन केले. कामांत दिरंगाई करणार्‍या कंपनीवर कारवाई करावी, आठवडाभरात रस्त्याचे काम करावे, मृतांच्या कुटुंबियांना तत्काळ 25 लाखाची आर्थिक मदत करावी आदी मागण्या आंदालनकर्त्यांनी यावेळी केल्या. दरम्यान चार तास वाहतुक ठप्प होती. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढल्यानंतर मृतांना उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. डुग्गीपार पालिसानी आरोपी बसचालकावर गुन्हा नोंद केला आहे.

Share