भारत- इंग्लंड सामन्याच्या तिकिटांची सोशल माध्यमांवर काळाबाजार : दोघांना घेतले ताब्यात

नागपूर : गुरुवारी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याच्या तिकिटांचा सोशल माध्यमांवर काळाबाजार सुरू असताना पोलिसांनी सदर येथील व्हीसीए मैदानाजवळूनच दोघांना ताब्यात घेतले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दोघेही विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे कर्मचारी असल्याची बतावणी करून काळाबाजार करत होते. आरोपींमध्ये ज्येष्ठ नागरिकाचादेखील समावेश आहे. सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

माहितीनुसार. मनोहर हेमनदास वंजानी (६२), डागा इस्पितळाजवळ, गांधीबाग व राहुल भाऊदास वानखेडे (३८), स्मृती ले आऊट, दत्तवाडी अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनाही व्हीसीएजवळून रंगेहाथ पकडण्यात आले. ऑनलाईन तिकीट खरेदी केलेल्यांना बारकोड दाखवून सिव्हिल लाईन्स व्हीसीएतून तिकीटाची हार्ड कॉपी घ्यायची होती. त्यासाठी सोमवारपासूनच क्रिकेटप्रेमींच्या रांगा होत्या. यासाठी पोलिसांचा बंदोबस्तदेखील तैनात होता. खबऱ्यांच्या माध्यमातून वंजानी व वानखेडे हे हेरिटेज हॉटेलजवळील गल्लीत जास्त दराने तिकीट विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

साउथ, ईस्ट स्टॅंडची तिकिटे जप्त –

पोलिसांनी तेथे जाऊन चाचपणी केली असता तेथे दोघेही जास्त दराने तिकीट विकताना दिसून आले. ते लोकांना व्हीसीएचे कर्मचारी असल्याची बतावणी करत होते. वंजानीकडून पोलिसांनी साऊथ स्टॅंडची दोन तिकीटे तर वानखेडेकडून ईस्ट स्टॅंडची चार तिकीटे जप्त केली. वंजानी तीन हजारांचे तिकीट सहा हजारांना विकत होता तर वानखेडे ८०० रुपयांचे तिकीट दोन हजारांना देत होता. या दोघांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली. त्यांच्याकडे तिकीटे कुठून आली याची चौकशी सुरू आहे.

Share