देवरी : कत्तलीसाठी अवैधरित्या जनावरे कोंबून घेवून जाणारा कंटेनर अनियंत्रित होवून रस्त्याच्या कडेला उलटला. या घटनेत ३५ जनावरांचा मृत्यू झाला. ही घटना देवरी तालुक्यातील वासनी ढासगढ फाट्याजवळ ५ फेब्रु.ला सकाळी १०.१५ वाजता सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेला पशुपालकांकडून चांगलाच रोष व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर या घटनेने जिल्ह्यात जनावर तस्करांची पोलखोल झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार छत्तीसगड राज्यातून मुर्तिजापूर येथे जनावरे कंटेनरमध्ये कोंबून वाहतूक केली जात होती. सकाळी १०.१५ वाजता सुमारा कंटेनर क्र.एमएच-३०/बीउी-१०९५ च्या चालकाचा नियंत्रण सुटला. दरम्यान वासनी ढासगड फाट्यावर अनियंत्रित कंटेनर रस्त्याखाली उतरून उलटला. आणि अवैधरित्या जनावर वाहतुकीचे बिंग फुटले. कंटनेरमध्ये कोंबून असलेले लहानमोठी ३५ जनावरांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चिचगड पोलिसांनी घटनास्थळ गाठले. या प्रकरणी वाहन चालकासह दोघांविरूध्द चिचगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे जनावर तस्करीची पोलखोल झाली आहे.
ढासगड फाट्याजवळ एक कंटेनर उलटला आहे, अशी माहिती मिळताच चिचगड पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दरम्यान घटनास्थळी उलटलेल्या कंटनेरमध्ये कोंबून असलेल्या ३५ जनावरे मृत्यूमुखी पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. मौका पंचनामा केला असता कंटेनरजवळ अ.राजिक अ.खालिक (३१) रा.पठाणपुरा वॉर्ड मूर्तिजापूर) व एक जण असे दिसून आले. दरम्यान सदर व्यक्तीच अवैधरित्या जनावरांची वाहतूक करीत असल्याचे समोर आले. यावरून दोन्ही आरोपीविरूध्द चिचगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून मृत जनावरांवर उत्तरीय तपासणी करून पिपरखारी जंगलात दफन करण्यात आले.
जनावर तस्करीसाठी नवनवे फंडे
जिल्ह्यात जनावर तस्करांविरूध्द कारवाई होत असली तरी तस्करी मात्र थांबता थांबेना, अशीच परिस्थिती पहावयास मिळत आहे. दर एक-दोन दिवसात पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईतून तस्करांच्या तावडीतून जनावरांची सुटका केली जाते. असे असले तरी तस्कर पोलिसांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे प्रत्यय आज (ता.५) देवरी तालुक्यात झालेल्या अपघातातून आले आहे. कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करण्यासाठी तस्करांनी नवा पर्याय शोधून काढला आहे. खुल्या वाहनातून तस्करी न करता पोलिसांना चकवा देण्यासाठी कंटेनरचा वापर केला जात असल्याचेही समोर आले आहे.









