लाडक्या बहिणींची रेशनवरील साखर ९ महिन्यापासून गायब !
गोंदिया : रेशन दुकानातून अंत्योदय रेशनकार्डधारकांना महिन्याला एक किलो साखरेचा पुरवठा केला जातो. प्रत्यक्षात वर्षभरात फक्त जानेवारी ते मार्च महिन्यातच साखरेचा पुरवठा झाला आहे. त्यानंतर नऊ महिन्यांपासून रेशन दुकानात साखर उपलब्ध झाली नसल्याने ८२ हजार ५५५ लाभार्थी लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत. अंत्योदय रेशनकार्डधारकांना मोफत धान्य मिळते. साखर मात्र सवलतीच्या दरात २० रुपये किलोप्रमाणे प्रत्येक रेशनकार्डधारकास एक किलो मिळते. यंदा वर्षभरात जानेवारी ते मार्च महिन्यात रेशन दुकानातून साखरेचा पुरवठा झालेला आहे. त्यानंतर पुन्हा एप्रिल, जून महिन्याची साखर एकत्र देणार असल्याचे पुरवठा विभागाने जाहीर केले. मात्र, साखर दुकानात आलीच नाही. शासनस्तरावर निविदा प्रक्रियेत काही अडचणी आल्याचे प्रशासनाने सांगितले. प्रत्यक्षात मार्चनंतरच्या नऊ महिन्यांत लाभार्थ्यांना साखर मिळाली नाही. बाजारात साखरेचे दर ४५ रुपये किलो आहे. गरीब कुटुंबांना या दराने साखर परवडत नाही. त्यामुळे ते रेशन दुकानातील साखरेची आशा करतात. मात्र, पुरवठा विभागाद्वारा साखरेसाठी ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे. आता हे वर्ष साखरेच्या प्रतीक्षेत संपले.