ग्रामसेवकांची हजेरी जीपीएस बायोमॅट्रीक पध्दतीने
आता ग्रामसेवकांना दांडी मारता येणार नाही
गोंदिया :ग्रामसेवक ग्रामविकासाचा केंद्रबिंदु समजला जातो. मात्र अनेक ग्रामसेवक हे त्यांच्या नेमणूक झालेल्या गावांमध्ये राहत नाहीत. गावकऱ्यांना कामासाठी ग्रामसेवकांचा शोध घ्यावा लागतो. काही ग्रामसेवक तर दांडी मारण्यात तरबेज आहेत. अशांना मात्र आता चाप बसणार आहे. ग्रामसेवकांची हजेरी जीपीएस आणि बायोमॅटीक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याबाबत शासनाच्या उपसचिव सीमा जाधव यांनी नुकताच एक आदेश काढून तो सर्व विभागीय आयुक्त, जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना रवाना केला आहे.
महाराष्ट्र विधान मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत दिलेल्या आश्वसनाच्या अनुषंगाने ग्रामसेवकांच्या हजेरीबाबत काही जिल्हा परिषदेमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी बायोमॅट्रीक हजेरी सारख्या अद्यायावत यंत्रणेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविली जाते. ग्रामसेवकाच्या बाबतीत ज्या ग्रामपंचायती या शहरी भागाच्या जवळ आहेत. अशा ग्रामपंचायतींमध्ये बायोमॅट्रीक हजेरी राबविण्यात येते. अतिदुर्गम डोंगराळ भागात नेटवर्क मिळत नसल्यामुळे बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे हजेरी प्रक्रिया राबविण्यास समस्या येऊ शकतात. मात्र, बहुतांश भागात नेटवर्क कनेक्टीव्हीटी उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायती या शहरी भागा लगत आहेत किंवा ज्या-ज्या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध आहे. अशा ठिकाणच्या ग्रामपंचायतीमध्ये बायोमॅट्रीक हजेरी प्रक्रिया राबविणे शक्य आहे. त्यामुळे ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांची बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली राबविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश शासनाच्या उपसचिव सीमा जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे दांडी मारणाऱ्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची चांगलीच गोची होणार असल्याचे पहावयास मिळणार आहे.