संभाव्य मंत्र्यांना फोन ; चव्हाण, मुनगंटीवार यांना विश्रांती

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी काही तासावर आला असताना रविवारी सकाळपर्यंत संभाव्य मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे भाजप व मित्र पक्षाच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर सकाळी १० वाजता संभाव्य मंत्र्यांना फोनव्दारे शपथविधीसाठी तयार राहा, असे निरोप देण्यात आले. त्यामुळे इच्छुकांचा जीव भांड्यात पडला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र चव्हाण आणि सुधीर मुनगंटीवार या शिंदे मंत्रीमंडळातील भाजपच्या दोन मंत्र्यांची नावे नव्या मंत्रिमंडळाच्या यादीत नाहीत, वर्धेचे भाजप आमदार पंकज भोयर यांना संधी मिळणार आहे.

रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दुपारी ४ वाजता राजभवनावर होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. एकीकडे शपथविधीची तयारी सुरू असताना दुसरीकडे मंत्री कोण होणार यांची नावे गुलदस्त्यात होती. विशेषत: विदर्भात शपथविधी आहे. या भागात भाजपचे अनेक प्रबळ दावेदार आहेत. मात्र नावे जाहीर न झाल्याने ते सर्व अस्वस्थ झाले होते. शिवसेना शिंदे व राष्ट्रवादीअजित पवार या गटातील इच्छुकांची अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती.

शपथविधीची तयारी

प्रशासनाने नागपूरच्या राजभवनमध्ये शपथविधीची सारी तयारी केली आहे. रविवारी दुपारी ४ वाजता शपथविधी पार पडेल, असे राजभवनाच्या सूत्राकडून सांगण्यात आले. २० ते २५ मंत्र्यांचा समावेश केला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात आहे.

भाजपाचे नेते गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, माधुरी मिसाळ आणि जयकुमार रावल यांनी माध्यमांसमोर येऊन त्यांना फोन आल्याचे सांगितले आहे. तर इतर नेत्यांपैकी चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, पंकजा मुंडे, गणेश नाईक, अतुल सावे, जयकुमार गोरे, संजय सावकारे, अशोक उईके, आकाश फुंडकर, मेघना बोर्डीकर, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले आणि पंकज भोयर यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती मिळत आहे.

Share