राज्यात बनावट औषधांचा रॅकेट, नागपुरातही बनावट औषधी आढळली
महाराष्ट्रातील तब्बल ११ जिल्ह्यांमध्ये बनावट औषध विक्री होत असल्याचा धक्कादायक अहवाल एफडीएनं सादर केला आहे.
प्रहार टाईम्स : राज्यात बनावट औषधांचा भांडाफोड करण्यात आला आहे . महाराष्ट्रातील तब्बल११ जिल्ह्यांमध्ये बनावट औषध विक्री होत असल्याचा धक्कादायक अहवाल एफडीएनं सादर केला आहे. काही दिवसांपूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाने बनावट औषध रॅकेट प्रकरणी मोठी कारवाई केली होती. या कारवाई FDA अनेक बनावट औषधं जप्त केली होती. आता या कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातून बनावट औषधांचं रॅकेट संपूर्ण राज्यभर चालवलं जात असल्याची माहिती समोर आलीय. ठाण्यातील वागळे इस्टेट आणि भिवंडीतील शांतीनगर भागातून हे रॅकेट ॲापरेट केले जात होतं.
कुठे कोणत्या प्रकारची बनावट औषधं सापडली?
बीडसह नागपूरमधील कळमेश्वर ग्रामीण रुग्णालय रेसिप्ट ५०० नावाचे बनावट अँटिबायोटिक आढळली होती. भिवंडीतील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये फॉरमॉक्स २५० नावाची गोळी बनावट आढळली. नागपूरमधील वैद्यकीय महाविद्यालय रिक्लॅव्ह ६२५ नावाची गोळी बनावट आढळली. वर्धा जिल्हा रुग्णालयात अझिश्रोमायसिन ही बनावट गोळी आढळून आली. नांदेड इथल्या रुग्णालयात बिफोसिव्ही ६२५ ही बनावट गोळी आढळून आली. आंबेजोगाई स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात ॲझिमसिम ही अँटिबायोटिक बनावट आढळली.
या रॅकेटकडून विविध औषधांच्या नावाखाली मक्याच्या पावडरची गोळी विकली जात होती. अँन्टीबायोटिक औषधांच्या नावाखाली रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात होता. या बनावट गोळ्यांमध्ये अँन्टीबायोटीक ऐवजी मक्याची पावडर आणि टालकम पावडर वापरली गेली होती. यापासून बनवलेल्या औषधांची विक्री राज्यभर केली जात होती. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्यांदा बनावट औषध विक्रीचं प्रकरण समोर आलं. यानंतर हे रॅकेट संपूर्ण राज्यात सक्रीय असल्याची माहिती समोर आली आहे.
एकाच गोळीचं नाव आणि आवरण बदलून ९ वेगवेगळ्या नावांनी या बनावट गोळीची विक्री केली जात होती, असं FDA च्या अहवालातून समोर आलं आहे. अझिमसिम ५००, रिक्लॅव्ह ६२५, फॉरमॉक्स एलबी ६२५, ॲंमॉक्सिलिन २५०, सिप्रोफ्लोक्सिम, लिव्होफ्लोक्सिम, सेफिक्सिम, बिफोसिव्ही, नॅकलॉस, अशा विविध नावांनी ही टॅबलेट विकली जात होती.