जिल्हा परिषदेच्या 240 शाळेत लागणार सीसीटिव्ही कॅमेरे
गोंदिया: शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी व प्रतिबंधकात्मक उपायोजना म्हणून जिल्ह्यातील 240 जिल्हा परिषद शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थिनीचे लैगिक शोषण होत असल्याचे वर्तमान पत्रातील बातम्यावरुन निदर्शनास येते. तसेच शासकीय सुट्टीच्या कालावधीत व दैनंदिन शाळेच्या कालावधीनंतर परिसरातील असामाजिक तत्व शासकीय मालमत्तेचे नुकसान करतात. समाजकंटकांकडून शाळेच्या पवित्र परिसराचा दुरुपयोग करण्याबाबतचा अनेक घटना झाल्या आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हयातील सर्व 240 जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शालेय परिसरात शैक्षणिक उपक्रमांवर वरिष्ठ पातळीवरुन उपाययोजना करता येईल. जिल्ह्यात शैक्षणिक वातावरण निर्मितीकरीता शिक्षकांवर अप्रत्यक्षरित्या नियंत्रण प्रस्थापित करण्याकरीता सीसीटिव्ही बसविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यासंबधाने त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले असून आवश्यक तरतूद करुन अंमलबजावणीकरीता प्रशासन तात्काळ कार्यवाहीकरीता सज्ज झालेला आहे. जेणेकरुन विद्यालयीन विद्यार्थीनीचे लैगिक शोषणाच्या घटनांवर आळा घालण्यास सोयीचे होईल.