संपादकीय: आता आमगाव विधानसभेत महाविकास आघाडीची कसोटी ; उमेदवारांचा हलबी समाजाच्या मतांवर डोळा

भुपेन्द्र मस्के
उपसंपादक, प्रहार टाईम्स न्युज नेटवर्क

आमगाव/ देवरी : भाजप काँग्रेस पक्षाने अनुसूचित जमातीच्या राखिव जागेवर पुराम विरुद्ध पुराम यांना तिकीट देत विधानसभेत बहुसंख्य असलेल्या गोंड जमातीला उमेदवारी दिली. या मात्र दोन वेळेस काँग्रेस पक्षाकडून विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या हलबी समाजाला या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांनी डावलले. निवडणुकीच्या स्पर्धेत हलबी समाजाचे एकगठ्ठा मत कोणत्या पक्षाला पडतात. यावर विधानसभेत कोणता उमेदवार जाणार हे अवलंबून आहे.

हल्ली राजकारणात जातीय समीकरण प्रामुख्याने विजयाच्या गणितासाठी आवश्यक असते. अनुसूचित जमातीच्या राखिव मतदारसंघात गोंड व हलबी जातीचे सगळे उमेदवार मागील तीन पंचवार्षिक एकमेकांना कडवी झुंज देत असल्याचा इतिहास आहे.या राखिव मतदारसंघात गोंड मतदार ५६ हजाराच्या जवळपास तर हलबी ४० हजाराच्या जवळपास आहे. कवर समाजाचे मतदार १६ हजारांच्या घरात आहेत. मात्र, गोंड समाजापेक्षा हलबी समाजाला विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर किमान हलबी समाजाचे डझनभर इच्छुक पुढे आले आहेत. यामुळे हलबी समाजाचे मतांचे ध्रुवीकरण कोणाच्या पथ्यावर पडणार अशी चर्चा मतदारसंघात आहे ?

आमगाव मतदारसंघात निवडणुकीचे वारे मागील तीन महिन्यांपासून वेगाने वाहू लागले आहे. हलबी समाजातील नवनवीन चेहरे आमदारकीसाठी पुढे येत असून किमान डझनभर इच्छुक तरी विधानसभेच्या मैदानात उतरतील, असे सध्याचे चित्र आहे. इच्छुकांची मांदियाळी बघता ही निवडणूक जातीच्या आधारावर लढली जाणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे ५६ हजार मतदारांना ४० हजार मतदारांचे मोठे आव्हान असणार आहे. हलबी समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण कोणाच्या विजयाला ब्रेक लावणार? हे निवडणुकीच्या काळातच कळणार आहे. मात्र हे नाराजी नाट्य महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जड जाईल असे राजकिय जाणकारांचे मत आहे.
तूर्तास एवढेच.

Share