गोंदिया जिल्हात पुरुषांपेक्षा 17 हजार महिला मतदार अधिक

गोंदिया: राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार जिल्हा प्रशासनही कामाला लागले असून निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात 11 लाख 21 हजार 460 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, मतदार संख्येचा विचार केल्यास चारही मतदार संघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या 17 हजार 88 मतांनी जास्त आहे.

जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या अधिसुचनेद्वारे 22 ऑक्टोबरला निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध करणे, 29 ऑक्टोबर नामनिर्देशपत्र सादर करण्याची अंतिम मुदत, 30 ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्राची छाणणी, 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, 20 नोव्हेंबर रोजी मतदान व 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सोशल मिडिया, पेड न्यूज व फेक न्यूजवर आयोगाची व जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार असून फेक न्यूज पसरविणार्‍यांवर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल कडक कारवाई करणार आहे. जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव असे 4 विधानसभा क्षेत्र आहेत. मंगळवारपर्यंत जिल्ह्यात 11 लाख 21 हजार 460 मतदार असून यामध्ये पुरुष मतदार 5 लाख 52 हजार 181 असून स्त्री मतदार 5 लाख 69 हजार 269 व इतर 10 मतदार आहेत. जिल्ह्यात निवडणुकीसाठी 1, 567 कंट्रोल युनिट, 2 852 बॅलेट युनिट व 1695 व्हीव्हीपॅट युनिट उपलब्ध आहेत. तर एकूण 1284 मतदान केंद्रावरुन मतदान होणार आहे.

लोकशाहीचा उत्सव असलेली ही निवडणूक पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल. बळाचा प्रयोग, पैशाचा वापर, चुकीची माहिती व आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ही निवडणूक यंत्रणेसमोरील महत्वाची आव्हाने असून यावर मात करण्यासाठी आयोगाच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्यात येतील.

अजित नायर, जिल्हाधिकारी, गोंदिया

Share