आपला नेता लई पॉवरफुल..! स्वयंघोषित उमेदवारांची गावोगावी मोर्चे बांधणी

देवरी : लोकसभेच्या लढतीनंतर सत्ताधारी महायुतीला मोठा पराभव सहन करावा लागला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे समीकरण आता बदलण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ असून या ठिकाणी येत्या काळात हायव्होल्टेज लढत पहावयास मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा परिणाम याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला आहे. या ठिकाणी विधानसभेसाठी मोठी चुरस असून येत्या काळात मविआ अन् महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उमेदवारी गुलदस्त्यात असून सुद्धा आपले भाऊ आणि साहेबाची मोठी सेटिंग आहे म्हणत कामकाढू कार्यकर्त्यांनी साहेब आणि भाऊशी जवळीकता साधलेली दिसते. गावागावातील बूथ सक्रिय झाले असून मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे.

ग्रामीण भागातील रस्ते, पूल आणि सोयी सुविधांचे बेहाल:

प्रत्येक भाषणाची सुरुवात आदिवासी बहुल मतदार संघ म्हणून करणाऱ्या लोकप्रतिनिधीनी पायाभूत सोयीसुविधेकडे सर्रास दुर्लक्ष केले असल्याचे मतदार राजाला अवगत आहे. विकासाचे तीन तेरा वाजलेल्या मतदान क्षेत्रात भावी उमेदवार कोणते लॉलीपॉप देण्याची शक्कल लढवणारे हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल:

लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा -गोंदिया असा मतदारसंघ आहे. त्यामध्ये गोंदियातील गोंदिया, अर्जुनी मोरगाव, तिरोडा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ मिळून हा लोकसभा मतदारसंघ झाला आहे. गडचिरोली मधील चिमूर गडचिरोली लोकसभा मतदारसंघ गोंदिया जिल्हाला जोडलेला आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर 2009 मध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या. त्यावेळी प्रफुल्ल पटेल पुन्हा येथून निवडणूक जिंकले. 2014 मध्ये भाजपने येथून नाना पटोले यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता . 2018 मध्ये या जागेवर पोटनिवडणूक झाली होती, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत ही जागा पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात आली आणि सुनील बाबुराव मेंढे खासदार झाले. 2024 मध्ये काँग्रेसचे प्रशांत पडोळे हे 37 हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांचा पराभव केला. या पाच निवडणुकीत राष्ट्रवादी दोन वेळा, भाजप दोन वेळा तर काँग्रेस एक वेळा विजयी झाला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रशांत पडोळे आणि डॉ. नामदेव किरसान यांच्या विजयाने विधानसभेचे समीकरणे बदलली आहेत.

मतदारसंघ व पक्षनिहाय आमदार :

गोंदिया : विनोद अग्रवाल (अपक्ष आता भाजप) , तिरोडा-गोरेगाव : विजय रहांगडाले (भाजप) , देवरी : आमगाव : सहषराम कोरोटे (काँग्रेस), मोरगांव अर्जुनी : मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

2019 मधील आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे समिकरण :

2019 साली झालेल्या अटातटीच्या विधानसभा निवडणुकीत आमगाव-देवरी मतदारसंघातून काँग्रेसचे सहषराम कोरोटे यांनी भाजपचे संजय पुराम यांचा ८ हजार मताने पराभव केला होता. या निवडणुकीत आमदार कोरोटे यांना 88 हजार 265 इतकी मत मिळाली होती. तर भाजपचे संजय पुराम यांना 80 हजार 845 मते मिळाली होती.

आमगाव-देवरीमध्ये सध्या काँग्रेसचे सहषराम कोरोटे हे आमदार असून या ठिकाणी भाजपकडून माजी आमदार संजय पुराम यांच्या नावाची चर्चा सुरू असून भाजप मधे देखील नवख्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. काँग्रेसकडून गडचिरोली-चिमूरचे खासदार नामदेव किरसान यांचे चिरंजीव दुष्यंत किरसान यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. काँग्रेसमध्ये देखील इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या ठिकाणी कोण निवडणूक लढणार यावरून कोण बाजी मारणार हे गुलदस्त्यात आहे.

Share