ब्रेकिंग 🚨 देवरी चिचगड मार्गावरील सालईटोला जवळ पूल खचला; वाहतुक बंद

देवरी-चिचगड-कोरची राज्यमार्गावरील पूल खचला

देवरी: जिल्हा व राज्याच्या टोकावर असलेल्या नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातील सालईटोला गावाजवळील देवरी-चिचगड-कोरची राज्य मार्गावरील पुलावरून अवजड ट्रक जाताच पूल खचल्याची घटना आज, ( दि १७ ) सकाळच्या सुमारास घडली. ही घटना सकाळी मार्निग वॉकला गेलेल्या नागरिकांना दिसून आली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहाणी झाली नाही. मात्र, पुल खचल्याने या मार्गावरील वाहतुक बंद झाली असून या मार्गावरील चिचगडसह अनेक गावांचा देवरी तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे.

जिल्ह्यात ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पुर परिस्थिती निर्माण होऊन अनेक मार्गावरील वाहतुक बंद झाली होती. दरम्यान, पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता सर्व सुरळीत असतानाच आज, सकाळच्या सुमारास देवरी- चिचगड-कोरची या राज्यमार्गावर असलेल्या सालईटोला गावाजवळील नाल्यावरील पुलावरून ट्रक जाताच सदर पुल खचला, सुदैवाने सकाळची वेळ असल्यामुळे वाहतुक पुर्णत: सुरु झालेली नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, ही सर्व घटना सकाळी मॉर्निंग वॉक ला गेलेल्या नागरिकांना दिसून आली. विशेष म्हणजे, चिचगड हे गाव तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक असताना गडचिरोली जिल्हा व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असल्याने नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. तर सदर मार्ग गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा राज्यमार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून दरदिवशी शेकडो वाहनांची रेलचेल असते. मात्र, पुल खचल्याने हा मुख्य मार्गच बंद झाला असून देवरीवरून चिचगडकडे किंवा चिचगडकडून देवरीकडे ये-जा करण्यासाठी इतर पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे या मार्गावरील नागरींकाची चांगलीच गैर सोय होणार आहे. तेव्हा स्थानिक प्रशासन व जनप्रतिनीधी कोणता मार्ग काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. घटनेची माहिती देवरी पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असून पुढील कारवाई सुरु आहे.

◼️तर घडला असता मोठा अनर्थ …

देवरी येथे मंगळवारी आठवडी बाजार राहत असून ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारात खरेदी करण्यासाठी येतात. अशावेळी दुपारनंतर ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता यात शंका नाही.

◼️विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

देवरी-चिचगड-कोरची या मार्गावर एसटी बसच्या शेकडो फेऱ्या होत असताना मानव विकासच्या बसेसही धावतात. तर या मार्गावरील चिचगड, ककोडी, सिंदिबीरी, बोरगाव (बाजार), सालईटोला, नक्टी आदी गावातील शेकडो विद्यार्थी विद्यार्जनासाठी एसटी बस, किंवा इतर साधनाने देवरी येथील शाळा-महाविद्यालयात येतात. मात्र, या मार्गावरील पुल खचल्याने व इतर पर्यायी मार्ग नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडणार असून त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

◼️या घटनेला जबाबदार कोण?

देवरी-चिचगड हा राज्यमार्ग थेट गडचिरोली जिल्ह्याला जोडत असतानाच छत्तीसगड राज्यालाही जोडतो. दरम्यान, चेकपोस्ट वाचविण्यासाठी छत्तीसगड राज्यात ये-जा करणारे अनेक जडवाहन या मार्गावरून काढण्यात येतात. त्यामुळे या मार्गावरून जडवाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना पैशांची देवाण-घेवाण करून प्रशासनाच्या डोळ्यादेखत येथून जडवाहनांची ये-जा सुरू असते. त्यातच काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. अशावेळी सदर पुल खचल्याने या घटनेला जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण होत असून पुलाच्या बांधकामावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
०००००००००

Share