देवरीचे बसस्थानक असुरक्षित? तळीरामांची दारू पार्टी बसस्थानकावर?
◼️खुल्लेआम चालते देवरी बस स्थानकावर दारू पार्टी , सोशल मीडिया वर फोटो वायरल
डॉ. सुजित टेटे । प्रहार टाईम्स
देवरी ◼️ गोंदिया जिल्हातील अतिदुर्गम भागांना जोडणारा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या देवरी बस्थानकाचे महत्वाचे स्थान आहे. महामार्गावर असल्यामुळे नागपूर,गोंदिया,रायपूर, चिचगड या मार्गासह ग्रामीण भागांना जोडणारा बस स्थानक सामान्य जनतेसाठी असुरक्षित असल्याचे पुन्हा सिद्ध झाले.
एकीकडे महिला सुरक्षा, बालिका सुरक्षा हा मुद्दा ज्वलंत असतांना देवरीचे बस स्थानकाकडे दुर्लक्ष का? असा सवाल देवरीच्या नागरिकांनी केला आहे. हजारोच्या संख्येने या बस स्थानकावर प्रवाशी येजा करतात. विशेष म्हणजे रात्री बेरात्री वृद्ध, नोकरदार, विद्यार्थी, मुली, महिला नागपूर- रायपूरच्या दिशेने या बस स्थानकावर उतरतात त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे.
चक्क सार्वजनिक ठिकाण असलेल्या बस स्थानकाच्या बैठक व्यवस्थेचा फायदा घेत तडीमारांनी आपल्या पार्टीचे नवीन ठिकाण शोधले असून याकडे प्रशासनाचे लक्ष का जात नाही याचे उत्तर निरुत्तरित आहे. विशेष म्हणजे देवरी बस स्थानकाचा इतिहास बघितले असता अनेक गुन्हे या ठिकाणी घडले असून, स्वच्छता गृहात सुद्धा मोठे गुन्हे घडल्याचे इतिहास आहे. सदर घडलेल्या गुन्हाची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये या साठी सबंधित प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.