जिल्हातील हिरकणी कक्षांना कुलूप?
गोंदिया ◾️जिल्ह्यातील अनेक सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला नोकरदारांची संख्या हजारावर आहे. परंतु तिथे महिलांसाठी पूरक सुविधा नाहीत. एसटी महामंडळाने सर्व स्थानकावर स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उभारला आहे. मात्र अनेक सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयात ही संकल्पना रुजली नसल्याने कामानिमित्त आलेल्या स्तनदा मातांना व कार्यालयात काम करणार्या महिला कर्मचार्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
हिरकणी कक्ष ही संकल्पना कामकाजी महिलांसाठी चांगली आहे. 60 बाय 60 च्या स्वतंत्र हिरकणी कक्षाची सुविधा असावी असे धोरण 2012 च्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केले. परंतु आतापर्यंत सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत नाही. स्तनदा माता व नवजात शिशुंचे कुपोषण यावर मात करण्यासाठी भारतीय स्तनपान प्रसारक मंडळाने हिरकणी कक्ष ही संकल्पना पुढे आणली. आरोग्य विभागाच्या राज्य कुटूंब कल्याण कार्यालय पुणे यांच्या माध्यमातून 2012 ला परिपत्रक काढले.
त्यानुसार हा कक्ष कसा असावा, त्याची ठेवण कशी व्हावी, तया खोलीत काय असावे, याबाबत मार्गदर्शक सूचना, वर्दळीच्या ठिकाणी अभ्यागत स्तनदा मातांना ही सुविधा देण्याची तरतूद परिपत्रकात नमूद करण्यात आली होती. परंतु हिरकणी कक्षाबाबत अद्यापही जनतेत जनजागृतीचा अभाव आहे, तर कार्यालय प्रमुख उदासिन धोरण अवलंबित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्तदना मातांची सार्वजनिक ठिकाणी कुचंबना होत असल्याचे दिसून येते.