बेशिस्त वाहनचालकांना 55.65 लाखांचा दंड

गोंदिया◾️ वाहतुकीस शिस्त लागावी, यासाठी जिल्हा वाहतूक शाखेतर्फे बेशिस्त व नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्याअंतर्गत वाहतूक शाखेने 1 जानेवारी ते 31 जुलै 2024 या सात महिन्यांच्या कालावधीत 55 लाख 65 हजार 350 रुपयांचा दंड ठोठावला आहे.शहरासह जिल्ह्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, वाहनचालकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या तर निर्माण होतेच शिवाय, अपघातांनाही निमंत्रण मिळते. गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यातील रस्त्यांवर 196 अपघात झाले यात 100 लोकांचा मृत्यू झाला तर 157 जणांना गंभीर दुखापत झाली. अपघात व अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक शाखेकडून नियमांचे उल्लंघन करणारे व बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. वाहतूक नियम मोडणार्‍या चालकांवर आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करणे व त्यांचा वाहन परवाना रद्द करण्याचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवले जातात. त्यानुसार शहरासह जिल्ह्यात गत सात महिन्यांत सुमारे 12 हजार 568 प्रकरणात दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून 55 लाख 65 हजार 350 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई विना हेल्मेट वाहन चालविणे, सीट बेल्ट न बांधणे, ट्रिपल सीट वाहण चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत वाहन उभे करणे, अति वेगाने वाहन चालविणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे आदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला.

58.13 लाखांची दंड रक्कम प्रलंबित

बेशिस्त चालकांवर ई चालन मार्फत दंडात्मक कारवाई केली जाते. जानेवारी ते जुलै 2024 या कालावधीत वाहतूक विभागाने केलेल्या 12568 प्रकरणांमध्ये 55 लाख 65 हजार 350 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याच कालावधीत 10139 प्रकरणांमध्ये 58 लाख 13 हजार 750 रुपयांचा दंड रक्कम वाहन चालकांकडे प्रलंबित आहे. त्यासाठी वाहतूक शाखेतर्फे संबंधित चालकांना नोटीस पाठवली जाते. लोक अदालतीतही या प्रकरणांचा निपटारा केला जातो.

भरधाव वेगाने जाणारे वाहने आणि बेभान दुचाकीस्वार याबाबत सावध राहून आजूबाजूला लक्ष द्यावे. रस्त्यात नेहमी वाहने उभी केली जातात, ते टाळले पाहिजे. कारवाई करून दंड वसूल करणे हा तोडगा नाही. वाहनचालकांनीही वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. वाहतूक सिग्नल बंद असताना पोलिस वाहतूक नियंत्रित करीत असतात, अशावेळी वाहन चालकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. प्रत्येकाने जर स्वतःची जबाबदारी ओळखून वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांवर नक्कीच नियंत्रण मिळविता येईल.

नागेश भास्कर , पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा गोंदिया

Share