60 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रेची टांगती तलवार
गोंदिया : ग्रामपंचायतच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या पदाधिकार्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीच्या सादर करणे गरजेचे असते. मात्र मुदत संपूनही तालुक्यातील 60 ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी निवडणूक विभागाकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. परिणामी त्यांच्यावर आता अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात जानेवारी 21 ऑक्टोबर 2022 व डिसेंबर 2022 मध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना ठराविक मदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र संबंधित कार्यालयात सादर करणे बंधनकारक होते. ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांना वैद्यता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाला. निवडून आलेल्या बर्याचशा ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडे सादर केले नसल्याचे आढळून आले.
विशेष म्हणजे, निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब शासनाच्या लक्षात आल्याने मुदतवाढ देण्याचा विचार करण्यात आला. ज्या व्यक्तीने नाव निर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिनांकपासून जात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी जात पडताळणी समितीकडे अर्ज केलेला असेल आणि ती व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंचाच्या राखीव जागेवर निवडून आलेली असेल. परंतु शासनाने काढलेल्या अध्यादेशाच्या प्रारंभाच्या दिनांकासह ज्याचा अर्ज पडताळणी समितीसमोर प्रलंबित असेल अशी व्यक्ती उद्या दिवसाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून 12 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करतील असे स्पष्टपणे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या 10 जुलै 2023 चे अध्यादेशात नमूद आहे. असे असतानाही तालुक्यातील 60 ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी निवडणूक विभागाकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. परिणामी त्यांच्यावर आता अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे.