जिल्हातील 4 हजार विद्यार्थ्यांना शाळेतच मिळाले एसटी पास
गोंदिया : आपल्या घरापासून शाळा व कॉलेजला जाण्यासाठी एसटीने प्रवास करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेत देण्यात येतील. त्याची अंमलबजावणी स्थानिक एसटी प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत 4 हजार 76 पासेसचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शालेय तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना एस.टी. मोफत पास योजनेमुळे पासेससाठी तासन्तास बसस्थानकावर रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून एसटी आगारातून महाविद्यालयात जावून पास वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांना पासची सोय शाळेतच करून दिल्याने विद्यार्थ्यांना फायदा झाला. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा यावर्षी पासधारक विद्यार्थी वाढले आहेत. 2024 मध्ये आत्तापर्यंत मोफत पास योजनेअंतर्गत 4 हजार 76 पासेसचे वाटप करण्यात आले.
त्यात अहिल्याबाई होळकर पास योजनेअंतर्गत जुलै महिन्यात गोंदिया तालुक्यात 1670, आमगाव 468 आणि गोरेगाव तालुक्यात 622 तसेच विद्यार्थी पास योजनेअंतर्गत गोंदिया तालुक्यात 904, आमगाव 280 व गोरेगाव तालुक्यात 132 विद्यार्थ्यांना पासेसचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे नियमित ये-जा करावी लागते. दररोजच्या तिकीटासाठी लागणारी रक्कम पालक लोकांना न परवडणारी असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एसटी महामंडळाने शैक्षणिक पासचा लाभ दिला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एसटी विद्यार्थी पास या योजनेचा लाभ महामंडळाने प्रवास पासद्वारे करता येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत आहे
विद्यार्थ्यांच्या वेळेत बचत
पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झाल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांना एसटीत 66 टक्के इतकी सवलत दिली आहे. केवळ 33 टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते.