माझे जीवन सदैव लोकसेवेसाठी समर्पित : संजय पुराम

सालेकसा ◾️मानव सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा आहे असे आमच्या राष्ट्रसंतानी सांगितलेला आहे. मी त्यांच्याच विचाराचा पाईक असून विद्यार्थी जीवनापासूनच लोकसेवेसाठी समर्पित आहे. कोणत्याही पदावर मी असो किंवा नसो माझ्या घरी नेहमीच जनता दरबार लागला असतो. सन 2024 ते 2019 पर्यंत आमगाव-देवरी-66 विधानसभेचा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. सन 2019 मध्ये निसटत्या मताने माझा पराजय झाला. तरी मी खचलो नाही, लोकसेवेसाठी समर्पित भावनेने कामाला लागलो, असे मनोगत माजी आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केले.

येिील पूर्ती पब्लिक विद्यालयात आयोजित रक्तदान, डोळे तपासणी व चष्मा वाटप शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिप अध्यक्ष पंकज राहांगडाले यांनी संजय पुराम यांना भविष्याचे मंत्री म्हणून संबोधले. तर गोंदिया भंडारा भाजपा संपर्कमंत्री वीरेंद्र अंजनकर यांनी आणखी शक्तीने जनतेची कामे करण्यास प्रोत्साहन दिले. माजी जिप अध्यक्ष विजय शिवणकर यांनी संजय पुराम यांच्यासारखा उर्जावान नेता मिळाल्याने विधानसभेतील जनतेला भाग्यवान असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना गोंदिया भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. येशुलाल उपराडे यांनी संजय पुराम यांच्यासारख्या युवा नेत्याची गरज आमगाव देवरी विधानसभेतील जनतेला व भाजपला असल्याचे सांगत संजय पुराम यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका जिप महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी केले. संचालन जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रतिभा परिहार यांनी केला. आभार भाजप नेते व पूर्ती पब्लिक विद्यालयाचे संचालक राजेंद्र बडोले यांनी मानले. प्रसंगी आमगाव तालुक्यातून मोठ्या संख्येने युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पूर्ती पब्लिक विद्यालयाच्या संचालिका शालिनी बडोले, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव टिकेश बोपचे, तालुका मंडळ अध्यक्ष गुमामानसिंग उपराडे, युवा मोर्चा अध्यक्ष देवराम चुटे, आदिवासी आघाडी अध्यक्ष सरोज परतेती, महिला भाजपा अध्यक्षा मधू अग्रवाल यांनी सहकार्य केले. दरम्यान, मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले. हजारोंच्या संख्येने डोळ्याच्या रुग्णांनी डोळे तपास करून चष्मे घेतले तर काहीना पुढील उपचारासाठी योग्य सल्ला देण्यात आला.

Print Friendly, PDF & Email
Share