लाडकी बहिन योजनेकरिता नगरसेवकांचे स्वयंखर्चातून नोंदणी केंद्र
देवरी◼️राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा, या उद्देशाने येथील नगर पंचायतचे नगरसेवक आफताब शेख यांनी स्वखर्चातून सुशिक्षित युवकांना योजनेचे प्रशिक्षण देऊन मदत केंद्र सुरु केले. लाडकी योजनेतंर्गत सध्या गावागावात अर्ज भरण्याची सुविधा शासनाने केली आहे. अंगणवाडी सेविका व संबंधित कर्मचार्यांकडून ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कागदपत्रांबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. शासनाच्या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा या उद्देशाने नगरसेवक आफताब शेख यांनी स्वखर्चातून सुशिक्षित युवकांना नारीशक्ती दूत अॅपचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्याच आफताब मंगल कार्यालयात मदत केंद्र सुरु आहे.या केंद्रात विनामुल्य अर्ज स्विकारले जात असून आतापर्यंत 700 च्यावर अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यासह राज्यातील लोकप्रतिनिधी व समाजसेवकांनी शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळवून देण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, अशी प्रतिक्रिया आफताब शेख यांनी दिली.