देवरी तालुक्यातील गावांना पुराचा फटका, अनेक गावांचा संपर्क तुटला

देवरी ◼️दोन आठवडे उशिरा हजेरी लावलेल्या मोसमी पासवाने जून महिन्यातील सारेच विक्रम मोडले आहे. गत 24 तासांत जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसामुळे देवरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पुलावरुन पाणी जात असल्यामुळे विद्यार्थी, नोकरदारवर्ग , कर्मचारी यांना कार्यालयात आणि शाळेत पोहचता येऊ शकले नाही. पावसासाठी आसुसलेला शेतकरी सुखावला असला तरी पेरणीसाठी पावसाने उसंत देणे आवश्यक आहे. आज दुसर्‍या दिवसीही संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नदी, नाले, तलावातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे 2 वक्रदार 0.30 मीटरने उघडण्यात आले असून 1596 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी, नाले व सखल भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसाने प्रशासनाची मात्र पोल खोल केली.

शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस आज शनिवारी सुरू होता. जिल्ह्यात जून महिन्यातील विक्रमी 107.8 मिमी पावसाची नोंद झाली. दोन दिवसात झालेल्या पावसाने गत वर्षीची सरासरी ओलांडली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 138.8 मिमी पाऊस बरसला होता.

Share