जनप्रतिनिधी भूमीपूजन आणि सोशल मीडियामधे ऍक्टिव, जनतेचे प्रश्न सोडविण्यात निष्क्रिय!
◼️देवरी आमगाव मुख्य रस्त्याचे बेहाल , ग्रामीण भागात नरक यातना
देवरी( प्रहार टाईम्स)◼️ तालुक्याला गोंदिया जिल्हाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची मोठी समस्या निर्माण झाली असून असंख्य प्रवासी रात्रंदिवस याच मार्गाने प्रवास करीत असतात. या खड्ड्यांमुळे एखाद्या प्रवाशाचा अपघात झाल्यावर प्रशासनाला तसेच जनप्रतिनिधीला जाग येईल काय? असा प्रश्न जनसामान्य लोकांनी उपस्थित केला आहे.
देवरी ते आमगाव मुख्य रस्त्याचे सिमेंटकरण करण्याचे बांधकाम पाटील कंपनीला शासनांतर्गत कंत्राट देण्यात आला होता. मागील वर्षीच सदर कंपनीने रस्त्याचे बांधकाम पूर्ण करून रहदारीला रस्ता मोकळा करून दिला. परंतु, सदर मार्गावरील येणाऱ्या भागी, बोरगाव, वडेगाव तसेच इतर ठिकाणी रस्त्यावर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले असून लग्जरी गाड्याने फिरणाऱ्या जनप्रतिनिधीना याची जाणीव होत नाही का असा देखील सवाल उपस्थित आहे.
पावसाळा सुरु झालेला असून खड्ड्यांमध्ये साचून असलेल्या पाण्यामुळे खड्ड्याच्या अंदाज न लागल्यामुळे अपघात शक्यता नाकारता येत नाही. सदर खड्ड्यामुळे देवरी आमगाव मुख्य रस्त्यावर कित्येक प्रवाशांचा अपघात झालेला असून, कोणाला किरकोळ जखमा तर कोणी जीवास मुकला आहे. या खड्ड्यांमुळे होणारे अपघात थांबण्याकरिता, परिसरातील प्रवाशांनी सदर मार्गावरील खड्डे लवकरात लवकर भरण्यात यावे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करावी. अशी मागणी प्रशासन तसेच स्थानिक जनप्रतिनिधीला केली आहे.
विशेष म्हणजे क्षेत्रातील जनप्रतिनिधीचा भूमीपूजन, फोटो शूट, आणि सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढविण्यात आणि केलेल्या कामाचा पुरावा देण्यात जास्त लक्ष असून जनसामान्यांच्या समस्यांकडे जातीने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.