देवरीच्या मुद्रांक विक्रेत्यांचे लेखनीबंद आंदोलन
देवरी◼️ कार्यालयातील दस्तऐवज लेखक, मुद्रांक विक्रेत्यांनी तहसील कार्यालय प्रशासनाविरोधात मंगळवार 16 जुलैपासून आंदोलन पुकारले आहे. शहरातील तहसील कार्यालय येथील दस्तऐवज लेखकांना बैठकीसाठी तहसील प्रांगणात कित्येक वर्षापासून कक्ष होते. परंतु, तहसील कार्यालयाची नवीन इमारत तयार करताना अर्जनविस कक्ष तोडण्यात आले. त्याठिकाणी लगतच्या जागेवर नवीन तहसील कार्यालयाची इमारत बांधण्यात आली. परंतु, नवीन इमारतीत दस्तऐवज लेखकांना बसण्यासाठी कक्ष तयार करण्यात आले नाही.
गोंदिया जिल्ह्यातील इतर तहसील कार्यालय परिसरात अर्जन्विस, मुद्रांक विक्रेत्यांची इमारत असून देवरी तहसील कार्यालयात का नाही? असा प्रश्न आंदालनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. दस्तऐवज लेखकांना तहसील कार्यालय इमारतीत बसण्यासाठी जागा देण्यात आली. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक कार्यासाठी ही जागा तहसीलदार यांच्या पत्रान्वये रिकामी करण्यात आली होती. यानंतर दस्तऐवज लेखक, मुद्रांक विक्रेत्यांनी तहसील कार्यालयापासून लांब एका खाजगी इमारतीत कार्य सुरू केले. परंतु, ही जागा नागरिकांसाठी त्रासदायक ठरू लागली. नागरिकांच्या त्रासाची जाणीव ठेवून, दस्तऐवज लेखक, मुद्रांक विक्रेत्यांनी बैठकीची जागा तहसील प्रांगणात मिळावी म्हणून जिल्हाधिकार्यांना निवेदनही दिले होते. मात्र त्यांनीही यात रस दाखवला नाही. दस्तऐवज लेखक, मुद्रांक विक्रेत्यांना उघड्यावर बसण्याची वेळ आल्यामुळे त्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारत तहसील कार्यालयात बैठकीची जागा उपलब्ध रून देण्याची मागणी केली आहे. मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे. यावेळी प्रीतम गजभिये, सचिन डुंभरे, हिरालाल बोरकर, रवींद्र वैद्य, विजय कापसे उपस्थित होते.