बनावट पत्राच्या आधारे भरती झालेले १६ शिक्षकांची मान्यता रद्द
गोंदिया–गोंदिया जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी २०१७-२०मध्ये दिलेली १६ शिक्षकांच्या भरतीची मान्यता रद्द करण्यात आली आहे. पुण्याच्या शिक्षण सहसंचालकांनी हे आदेश दिले आहेत.
राज्य सरकारने २ मे २०१२ला शिक्षक भरतीवर बंदी घातली होती. गरज पडल्यास काही विशिष्ट अटींच्या अधीन राहून भरतीला परवानगी देण्यात येणार होती. मात्र अटींची कुठलीही पूर्तता न करता गोंदिया जिल्ह्यातील ५३ शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यात आल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण संचालकांकडे या तक्रारी झाल्या होत्या. विशेष चौकशी समिती नेमून घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याची मागणी माजी शिक्षक आमदार नागो गाणार, विदर्भ शिक्षक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघासह अनेक संघटनांनी केली. या घोटाळ्यातून शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर महिन्याला दीड कोटी रुपयांचा खर्च होत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला होता. चौकशीनंतर २०२१मध्ये नागपूरच्या शिक्षण उपसंचालकांनी ५२ शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आता तीन वर्षांनी परत १६ शिक्षकांवर कार्यवाही करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास मंत्रालयातून व्हावा यासाठी नागो गाणार यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आवाज उठविला होता.
यामध्ये सहाय्यक शिक्षक विनोद हेमराज जगणे, जी. एम. हरिणखेडे (सेजगाव हायस्कूल), एम. पी. समरित, एस. पी. डोंगरे (गणेश हायस्कूल गुमधावडा), निशा विजयसिंग नागपुरे (एसएसपीडी हायस्कूल म्हसगाव), दीपिका गुलाब दमाहे (स्वामी विवेकानंद हायस्कूल सोनपुरी), कमलेश शालिकराम ठाकूर, संजय ग्यानीराम बिरनवार (हरिदास भवरजार गणखेरा), महेश शिवसागर बडोले, ममता जगतलाल अम्बुले (फुलीचंद भगत हायस्कूल कोसमतोडी), अनिता प्रेमलाल मेंढे, हिमांशी युगल मोहन (परशुराम विद्यालय मोहगाव), शालू धनराज कोटांगले, प्रियंका मुखरू शामकुळे (अमृताबेन पटेल हायस्कूल रिसामा), स्मिता प्रमोद कटरे (डॉ. आंबेडकर माध्यमिक विद्यालय सरकारटोला) आदींचा समावेश आहे.