देवरी तहसील कार्यालयाची कामे रेंगाळली
नियमित तहसीलदार नसल्याने कार्यालयीन कामात दिरंगाई
देवरी :गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी, अतिदुर्गम, जंगलव्याप्त, नक्षलप्रभावित तालुका म्हणून ओळख असलेले देवरी तहसील कार्यालय सध्या नियमित तहसीलदारां अभावी वाऱ्यावर आहे. येथे नियमित तहसीलदार नसल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्रे, मुख्यमंत्री. लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे दाखले व इतर कार्यालयीन दस्तऐवज वेळेत मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सविस्तर असे की, अतिदुर्गम आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या देवरी तालुक्यातील लोक ४५ कि.मी. अंतरा वरून विद्यार्थी व लोक शासकिय कामाकरीता येथील तहसील कार्यालयात येतात परंतू तहसील कार्यालयात नियमित तहसीलदार नसल्याने नवीन शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना लागणारे कागदपत्रे, महिलांना लाडली बहिण योजने करीता उत्पन्नाचे दाखले व इतर लोकांना लागणारे कार्यालयीन कागदपत्र वेळेवर मिळत नाही. येथे नियमीत तहसीलदार नसल्याने कर्मचाऱ्यांकडूनही नागरिकांच्या कामात ‘दिरंगाई होत आहे. परिणामी नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध कमालीचा रोष आहे. जिल्हा प्रशासन व स्थानिक आमदारांचे दुर्लक्षही याला कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
देवरीचे तहसीलदार संतोष महाले यांची प्रकृती बरी नसल्याने दीर्घ रजेवर आहेत.त्यामुळे चिचगडचे अप्पर तहसीलदार यांच्याकडे येथील तहसीलदाराचा प्रभार सोपविण्यात आला आहे.
यात विशेष म्हणजे विविध ठिकाणी आवश्यक असणारी तहसीलदारांची डिजिटल स्वाक्षरी अद्यापही अद्ययावत करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना आवश्यक दाखले, प्रमाणपत्र व इतर दस्तऐवजांवर स्वाक्षरीअभावी वेळेत कागदपत्र मिळत नसल्याने सर्वसमान्य नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात नाराजीचा सूर आहे. देवरी येथे नियमित तहसीलदार नियुक्त करावा, तत्काळ प्रभारी तहसीलदारांची डिजिटल स्वाक्षरी अद्ययावत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.