निकृष्ठ भोजनाचा विषयावर नवोदय विद्यालयाची पालक सभा रंगली !
गोंदिया : जिल्ह्यात अग्रणी समजल्या जाणार्या नवेगावबांध येथील पीएमश्री जवाहर नवोदय विदयालयात शनिवार 13 जुलै रोजी शिक्षक-पालक सभा घेण्यात आली. सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र विद्यार्थ्यांना दैनिक दिला जाणारा निकृष्ठ भोजनाचा विषय चांगलाच गाजला.
सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्वजिल्ह्यातच उच्च दर्जाच्या मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यानिहाय केंद्रीय नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे ही शाळा सुरू आहे. 1 जुलैपासून शैक्षणिक सत्राचा प्रारंभ झाला. येथे 6 वी तू 12 वीपर्यंतचे शिक्षणासह निवास व भोजनाची सोय निःशुल्क आहे. याशिवाय गणवेश, पाठ्यपुस्तके, क्रीडा साहित्य, लेखन सामग्री, स्टेशनरी आदींचा खर्चही विद्यालयामार्फतच केला जातो. लेखी परीक्षा व गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळतो. एकूण जागेच्या 75 टक्के जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. शाळा व्यवस्थापणावर देखरेखीसाठी शिक्षक-पालक समिती गठीत केली जाते.
यात प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी पुरुष, महिलांसह 14 प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे. शनिवारी समितीची सभा नियोजित करण्यात आली. सभेत सडक अर्जुनी येथील पालक प्रतिनिधी शालींदर कापगते यांनी विद्यार्थ्यांना दिला जाणार्या निकृष्ठ भोजनाचा मुद्दा उपस्थित केला. याला इतरही पालकांनी दुजोरा दिला. सत्राच्या सुरवातीपासूनच पाल्य पालकांकडे स्वादिष्ट जेवन मिळत नसल्याची तक्रार करत असल्याचे कापगते यांनी समिती सचिवांच्या लक्षात आणून दिले. काही पालकवर्गांनी स्थानिक आ. विनोद अग्रवाल व तिरोडाचे आ. विजय रहांगडाले यांना ही बाब सांगीतली होती. काही पालक जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची भेट घेत निकृष्ठ जेवणाचा मुद्दा त्यांच्या निदर्शात आणून देणार असल्याचे कापगते यांनी सांगताच प्राचार्य मिश्रा यांनी त्यांचे बोलणे थांबवून तुम्हाला जिथेकुठे तक्रार करायची आहे करा, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, पंतप्रधान कुणालाही मी घाबरत नाही, माझे काम प्रागाणिकपणे करतो आहे. तक्रारवजा विषय मांडण्याची गरज नसल्याचे बोलले.
निकृष्ठ जेवनाचा विषय गंभीर असताना प्राचार्यांचे वक्तव्य पालकांमध्ये रोष निर्माण करणारे ठरले. यापुर्वी येथे प्राचार्य थूल कार्यरत असताना जेवनासंर्भातील तक्रारी पाल्यानी केल्या नसल्याचेही पालकांनी सांगीतले. असेच निकृष्ठ जेवन मिळत राहिले तर पाल्यांचे आरोग्य कसे राहणार या विवंचणेत पालक आहेत, आता जिल्हाधिकारी यांनीच प्रत्येक्ष विद्यालयात मिळणार्या जेवन चाखावा, असा सूरही पालकांमध्ये उमटूल्याचे पहावयास मिळाले.
मी माझ्याकडून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करीत आहे, जेवन निकृष्ठ वाटत असल्यास त्यांनी ते वेळोवेळी तपासून घ्यावे. यावरही पालकांचे समाधान होत नसेल तर त्यांनी जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, पंतप्रधान वाटेल तिथे तक्रार करावी, मी घाबरत नाही.
– प्राचार्य मिश्रा, नवोदय विद्यालय,
नवेगावबांध