जिल्हा परिषद शाळेच्या पहिलीतील विद्यार्थिनीचा विजेचा धक्का लागून शाळेत मृत्यू

भंडारा : शाळेत गेलेल्या एका पहिलीतील विद्यार्थिनीला शाळेतीलच स्वच्छतागृहात विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाली. ही दुर्दैवी घटना बुधवारी ३ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली. यशस्वी सोपान राऊत (६ वर्षे) असे घटनेतील मृत बालिकेचे नाव आहे.

यशस्वी हिने यावर्षी गावातीलच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता पहिल्या वर्गात प्रवेश घेतला होता. १ जुलै रोजी नवीन सत्राच्या शाळा सुरू झाल्या. यशस्वी पहिल्या दिवसापासून शाळेत नियमित हजर होती. बुधवारी सकाळी यशस्वी शाळेत गेली होती. शाळेत गेल्यानंतर ती स्वच्छतागृहात गेली असता तिथे पडलेल्या सॅनिटरी पॅड डिस्पोज करणाऱ्या ताराला तिचा स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. अन्य विद्यार्थीनी या स्वच्छतागृहात गेल्या असता त्यांना यशस्वी पडलेल्या अवस्थेत आढळून आली. विद्यार्थीनींनी या घटनेची माहिती शिक्षकांना दिली. शिक्षकांनी तिला तातडीने उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. शाळेत विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची माहती गावात पसरताच अनेकांनी गर्दी केली. आपली मुले सुरक्षित आहेत का, याची अनेक पालक चौकशी करताना दिसले. या प्रकाराबद्दल गावकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. यशस्वीच्या पालकांचा आक्रोश हृदय हेलावणारा होता.

पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी आरंभली आहे. सॅनिटरी पॅड डिस्पोज करणाऱ्या मशिनचा विद्युत पुरवठा सदोष होता, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share