गोंदिया जिल्हात फक्त २५ सारस शिल्लक, सारसाचे अस्तित्व धोक्यात

गोंदिया◼️ जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे वनविभाग व जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 23 जून रोजी सारस गणनेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा आणि आमगाव तालुक्यांतर्गत सारस वास्तव्यास असलेल्या 70 वेगवेगळ्या ठिकाणी स्वयंसेवक, सारस मित्र, शेतकरी आणि गोंदिया वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी सकाळी 5 ते 9 या वेळेत गणना केली. यावेळी फक्त 25 सारस पक्ष्यांची नोंद झाली. सारस पक्ष्याच्या संवर्धनावर शासन दरवर्षी लाखो रुपये खर्चकरीत असले तरी याचा यासाठी काहीएक लाभ झाल्याचे दिसून येत नाही.

प्रेमाचे प्रतीक व हवेत उडणारा सर्वात उंच पक्षी म्हणून गौरवल्या जाणार्‍या सारस पक्ष्याचा अधिवास हा धोक्यात आला आहे. गतवर्षी गोंदिया जिल्ह्यात 31 तर जवळील भंडारा जिल्ह्यात 2 सारस पक्षी उरलेले आहेत. व्याघ्र संवर्धन व वनोपज उत्पनावर लक्ष केंद्रित असलेल्या वनविभागाचे सारस पक्षाकडे दुर्लक्ष होण्याची ओरड नेहमीच होते. याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेत सरकारला जाब विचारला होता. यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. आता सारस पक्षी आणि त्यांचा अधिवास वाचविण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु झाले असले तरी त्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. जिल्ह्यात तलावांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पूर्वी येथे सारस पक्षी बर्‍यापैकी आढळायचे. त्यांच्या अधिवासात झालेल्या मानवी हस्तक्षेपामुळे त्यांना धोका वाढला आहे. 

सारस गणनेच्या चार वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास 2020 मध्ये 45, 2021 मध्ये 39, 2022 मध्ये 34, 2023 मध्ये 31 आणि 2024 मध्ये 25 सारस आढळले. चार वर्षात जिल्ह्यात सारस पक्ष्यांची संख्या वाढण्याऐवजी 20 ने कमी झाली. शेजारील मध्य प्रदेशातील बालाघाट व चंद्रपूर जिल्ह्यातही सारस पक्षांचा अधिवास आहे. सारस पक्ष्यांचे वैभव म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोंदिया जिल्ह्यात त्यांच्या संख्येत घट होत असल्याने सारसचा माळढोक होण्याची शक्यता बळावली आहे. सारस पक्ष्यांची घटती संख्या लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून याचिका दाखल करून सारस संवर्धनासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यानंतर प्रशासनाने उपाययोजना करण्याच्या नावावर केवळ पुस्तक छापले.

Share