वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या ताब्यात

गोंदिया: आरोग्य संस्थेत कार्यरत कनिष्ठ सहायकाची विविध भत्त्यांच्या फरकाची थकबाकी रकमेच्या बिलांवर स्वाक्षरी करण्यासाठी लाचेची मागणी करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवार 24 जून रोजी ताब्यात घेतले. डॉ. अंबर श्रीराम मडावी (44) असे लाचखोर वैद्यकीय अधिकार्‍याचे नाव आहे.

अर्जुनी मोर तालुक्यातील नवेगावबांध येथील रहिवासी तथा महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत तक्रारदार (33) यांच्या वेतन निश्चिती, नक्षल, प्रोत्साहन व अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकीच्या फरकाची 6 लाख 7 हजार 320 रुपयांच्या बिलावर स्वाक्षरी करून जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या कार्यालयात पाठविण्याकरिता बाराभाटी आयुर्वेदीक दवाखाण्यात कार्यरत तथा महागाव प्रा. आ. केंद्राचा अतिरिक्त कार्यभार असलेले डॉ. अंबर मडावी याने बिलाच्या रकमेवर 10 टक्केप्रमाणे 60 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तक्रारदारास लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी 11 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारीच्या आधारे पथकाने 11 व 12 तारखेला अर्जुनी मोरगाव येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात सापळा लावला. दरम्यान डॉ. मडावी याने पंचांसमक्ष तडजोडीअंती बिलाच्या रकमेवर 8 टक्केप्रमाणे 48 हजार रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. या आधारे पथकाने सोमवारी मडावी याला ताब्यात घेतले. त्याविरोधात अर्जुनी मोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share