चानाक्ष व धारदार पत्रकारीते करीता विषयांचा सखोल अभ्यास असने गरजेचे

◼️माजी आमदार हेमंत पटले यांचे प्रतिपादन

◼️गोरेगावात पत्रकार संघाचा नवरत्न अवार्ड सोहळा थाटात

गोरेगाव : सुदृढ पत्रकारीता लोकशाहीचा चौथा स्तंभ असून बदलत्या काळानुसार जनमाणूस अन्याय व भ्रष्टाचाराच्या विळख्यात जखडला जात आहे. एकविसाव्या शतकात भारत आर्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. परंतु प्रत्यक्षात जमीनीवर शासकीय यंत्रणेतील लालफित शाहीमुळे कामकरी, शेतकरी, व्यापारी, उद्योगपती हवालदिल आहे. अर्थात शासकीय यंत्रणेवरील अंकुश ठेवण्याची मोठी जबाबदारी प्रसार माध्यमावर येऊन ठेपलेली आहे. तेव्हा चानाक्ष व धारदार पत्रकारीते करीता विषयांचा ,शासकीय निर्णयाचा व परीपत्रकांचा सखोल अभ्यास अनिवार्य असल्याचे प्रतिपादन गोरेगांव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार हेमंत पटले यांनी केले.

गोंदिया जिल्हा मराठी पत्रकार संघ शाखा गोरेगावच्या वतिने रविवार 23 जून रोजी गोरेगाव येथील सभागृहात ‘ मिडिया नवरत्न अवार्डʼ सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या उद्घाटन कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून माजी सरपंच व ज्येष्ठ कलावंत जिवनलाल लंजे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गोरेगाव पंचायत समीतीचे सभापती इंजि. मनोज बोपचे यांनी तर दिप प्रज्वलन जि. प. सदस्य जितेंद्र कटरे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे गोरेगाव तालुकाध्यक्ष केवलराम बघेले, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष ओम कटरे, माजी जि.प. सभापती विश्वजीत डोंगरे, माजी जि.प. सदस्य जगदीश येरोला, पंचायत समीतीचे माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन, पं.स. सदस्य रामेश्वर महारवाडे, माजी सरपंच सोमेश्वर रहांगडाले, गोरेगाव तालुका दक्षता समीतीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद ठाकरे, राहुल चंद्रिकापूरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना पटले म्हणाले की, ज्या योजना शासन दरबारातून लोकांसाठी पुरविल्या जातात, अशा योजनांची काटेकोर अमंलबजावणी शासकीय यंत्रणेच्या कर्तव्यात येते.
अमंलबजावणी करणारे विविध शासकीय विभाग असतात. त्या द्वारे जनता जनार्धनाचे काम त्वरीत व विना भ्रष्ट्राचाराने व्हावेत अशी अपेक्षा असते.
परंतु शासकीय यंत्रणेतील लालफित शाही,भ्रष्टाचार, अनास्था, विविध कारणे सांगून थातूरमातूर कार्यवाही इत्यादी कारणामूळे सामान्य माणूस भरडून निघत आहे. परीणामी सामान्य माणूस कमालीचा असंतोषी होत आहे.
सुपीक लोकशाहीसाठी असे वातावरण मुळीच संयुक्तिक नाही. यावरील नियंत्रणाची जबाबदारी इतर घटकासह प्रसार माध्यमाची सुध्दा असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य वक्ते जीवन लंजे यांनी आजची पत्रकारिता व पत्रकारितेत झालेले बदल, त्याचबरोबर समाजात पत्रकारांचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष भरत घासले यांनी प्रास्ताविकातून पत्रकारितेचे कार्य विषद केले.
या प्रसंगी सत्र 2024-25 चे मिडिया नवरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ज्यामध्ये गोरेगावचे उद्योगपती माजी सभापती लक्ष्मीकांत बारेवार यांना उद्योग रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला तर गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार अशोक रूपचंद येळे यांना लोकसेवक रत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर दिनेशकुमार रामदास अंबादे यांना साहीत्य रत्न, डाॅ.रूस्तम प्रेमलाल येळे यांना आरोग्य सेवा रत्न, संतोष राजाराम नागनाथे यांना पत्रकार रत्न, सुरेश नत्थुलाल रहांगडाले यांना समाज रत्न, पकंज रामलाल पटले यांना कृषीरत्न, जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा जानाटोला (घोटी) या शाळेला शिक्षण रत्न तर गुन्हेगारी मुक्त रत्न गाव म्हणून मलपूरी (हिरापूर) या गावाला सन्मानित करण्यात आले. दरम्यान, सर्व सत्कारमुर्तींना शाल,श्रीफळ,व स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन से.नि.प्राचार्य मंजूश्री देशपांडे यांनी तर देवेंद्र रहांगडाले यांनी आभार प्रदर्शन केले. प्रसंगी सचिन दीनदयाल पटले यांना पर्यावरण मित्र म्हणून त्यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर राहुल हटवार उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता, मनीषा पटले उत्कृष्ट महिला सरपंच, नरेंद्र चौरागडे उत्कृष्ट सरपंच, जीवन लंजे उत्कृष्ठ लोक कलावंत, संघर्ष चालक मालक संघ यांना उत्कृष्ठ संस्था, व नागझिरा स्वंय सहायता बचत गटाला उत्कृष्ठ बचत गट म्हणून गटाच्या पदाधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद नागनाथे, सचिव दिलीप चव्हाण, सहसचिव डिलेश्वर पंधराम, सतिश वाघ, रवि पटले, सुरेश गौंधरे, राजेश ठाकरे, लक्की शास्त्री, निहार राठोड, रोहित बिसेन, दिपक बोपचे आदींनी सहकार्य केले.
०००००००००००

Share