जलजीवन च्या विहरीत मजुराचा बुडून मृत्यू, २२ तासानंतर मृतदेहाचा शोध

अर्जुनी मोर: पाणी पुरवठा करणार्‍या विहीरीतील नादुरूस्त विद्युत मोटारपंप काढण्यासाठी उतरलेल्या इसमाचा विहीरीत बुडुन मृत्यु झाल्याची घटना काल मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तालुक्यातील निमगाव तलाव परिसरात घडली होती. आज बुधवार 19 जून रोजी चार मोटारपंपाने विहिरीतील पाण्याचा उपसा करून तब्बल 22 तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी 12.30 वाजे मृतक माधो सोविंदा मेश्राम (50) रा. बोंडगावदेवी यांचे प्रेत शोधण्यात अग्नीशमनदलाच्या पथकाला यश आले.

निमगाव येथे जलजिवन मिशन अंतर्गत जल कुंभ व विहीर बांधकाम प्रगतीपथावर आहे. विहिरीचे काम सुरु असताना विहिरीतील पाणी उपसा करणारी पाणबुडी इलेक्ट्रिक मोटार विहीरीत पडली. मोटार बाहेर काढण्यासाठी माधो मेश्राम यांना बोलाविण्यात आले होते. मृतक माधो यांना विहीरीतुन साहित्य काढण्यात महारत होते. मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास माधो विहीरीत उतरले. विहिरीमध्ये 20 ते 25 फुट पाणी होते. विहीरीत उतरल्यानंतर दोन ते वेळा ते पाण्याबाहेर आले. मोटार बांधण्यासाठी दोर घेवुन गेल्यावर पुन्हा पाण्याबाहेर आलाच नाही. त्यामुळे त्याचा विहीरीतच मृत्यु झाला असावा असा अंदाज वर्तवून कालपासून नगरपंचायतीच्या अग्नीशमण दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रेताचा शोध सुरू होता. मात्र प्रेत गवसले नाही. आज चार विद्युत पंपाने विहिरीतील पाण्याचा उपसा केल्यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान मृतदेह गवसला. यानंतर प्रेताचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर प्रेत कुटुंबियांच्या स्वाधिन करण्यात आले.

Share