कुंभारेनगरात युवकाची धारदार शस्त्राने हत्या, आरोपीला अटक

गोंदिया : जुन्या वैमनस्यातून एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना शहरातील कुंभारेनगरात 18 जून रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडली. दादू उर्फ उज्ज्वल मेश्राम (17) रा. भिमनगर असे मृतकाचे नाव आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच गुन्हेशाखेच्या पथकाने मुख्य आरोपी अंकीत घनशाम गुर्वे (22) रा. सिंगलटोली आंबेडकर वार्ड गोंदिया याला आज दुपारी बेड्या ठोकल्या. त्याचा साथीदार राहुल प्रशांत शेंडे (21) रा. सिंगलटोली आंबेडकर वार्ड गोंदिया हा फरार आहे. गत दोन महिन्यांत शहरात चार हत्यांच्या घटनांनी शहर हादरून निघाले आहे. दरम्यान रात्रीच संतप्त नागरिकांनी पोलिस स्टेशन गाठून तत्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

प्राप्त माहितीनुसार मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास अंकीत व राहुल उज्वलच्या घरासमोर आले. त्यांनी त्याला बोलावून आपल्या सोबत घेऊन गेले. कुंभारेनगरातील आंबेडकर भवनजवळ नेऊन उज्वलवर धारदार शस्त्राने वार करून पळून गेले. गंभीर अवस्थेत उज्वलला येथील जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरानी तपासून त्याला मृत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळ, जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. याप्रकरणी मंजू निशांत मेश्राम (32) रा. भीमनगर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 302, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. तपासाची चक्रे फिरवून मुख्य आरोपीस पोलिसांनी आज 19 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अटक केली. फरार आरोपी राहुलच्या मागावर पोलिस पथक असून त्यालाही लवकरच अटक करू, असे उपविभागिय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांनी आयोजित पत्र परिषेत सांगीतले.

उज्वलने अंकीतच्या वडीलांना केली होती मारहाण

मृतक उज्वल व आरोपी अंकीत हे रेल्वेत खाद्य पुरविण्याचे कामाला होते. काहि महिन्यांपुर्वी अंकीतचे वडील घनशाम व उज्वल यांच्यात आर्थिक देवाण-घेवाणीवरून वाद झाला. यावेळी उज्वलने घनशाम यांना मारहाण केली होती. याच रागातून अंकीतने उज्वलला ठार केल्याची माहिती बानकर यांनी दिली.

घटनास्थळावरून दोन चाकू, दगड हस्तगत

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. हल्ला झालेल्या ठिकाणाच्या पहाणी दरम्यान पोलिसांना घटनास्थळावर रक्ताने माखलेले दोन चाकू व दगड मिळाले.

Print Friendly, PDF & Email
Share