सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या निगराणीत गोंदिया पोलिस भरती १९ पासून

गोंदिया: जिल्हा पोलिस आस्थापनेवर रिक्त पोलिस शिपाई भरती बुधवार 19 जूनपासून कारंजा येथील पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात सुरू होत आहे. भरती पारदर्शक होण्यासाठी मैदान व परिसरात 70 कॅमेरे बसविण्यात आले असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांनी आज सोमवार 17 रोजी येथील शहर पोलिस ठाण्यात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. 110 जागांसाठी 8 हजार 26 उमेदवारांनी अर्ज केले आहे.

जिल्हा पोलिस भरतीची संपूर्ण भरती प्रक्रिया गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात पोलिस मुख्यालय येथे 19 जून रोजी सकाळी 5 वाजतापासून घेण्यात येईल. भरती प्रक्रिया 17 दिवस चालणार आहे. 110 जागांसाठी 2 हजार 372 महिला, 2 तृतीयपंथी व 5 हजार 652 पुरूषांचे अर्ज आले आहेत. ज्या उमेदवारांना ज्या तारखेचे हॉल तिकीट प्राप्त झाले आहे त्यांना त्याच दिवशी प्रवेश देण्यात येणार आहे. कुठल्याही कारणाने, एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज करणार्‍या उमेद्वाराने कळवावे त्यानुसार त्यांचा चाचणीचा वेळ बदलवून देता येईल त्यासाठी अर्ज करावे, असे पिंगळे म्हणाले. सर्वप्रथम महिला उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी प्रक्रिया घेण्यात येणार आहे. police recruitment संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हीडीओग्राफी, सीसीटीव्हीच्या निगराणीत होणार आहे. यासाठी जिल्हाभरातून 250 पोलिस अधिकारी, कर्मचारी तैणात राहतील. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची तात्पुरती निवड सूची तयार करण्यात येईल. यामध्ये पात्र उमेदवारांचे कागदपत्र पडताळणीनंतर उमेदवारांचाच निवड सूचीमध्ये समावेश केला जाणार असल्याचे पिंगळे म्हणाले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, पो. नि. सुर्यकांत चंद्रवंशी उपस्थित होते.तक्रारीसाठी 112 वर डायल करा

भरती संदर्भात वशिला, भूलथापा, आमिष देत असेल तर त्या व्यक्तीचे नाव जवळच्या पोलिस ठाण्यात द्यावे, पोलीस अधिक्षकांच्या ई मेलवर किंवा डायल 112 वर माहिती द्यावी. आमिष देणार्‍यावर कारवाई करण्याची हमी एसपींनी दिली. भरतीसाठी येणारे उमेदवार, पालकांनी कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये. कुणी नोकरीचे आमिष देत असल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करावी, असे आवहनही पिंगळे यांनी केले.अशी होईल शारीरिक मैदानी प्रक्रिया

सर्वप्रथम उमेदवारांच्या प्रवेशपत्र स्वीकारणे नंतर उंची, वजन, छाती (महिला सोडून) मोजमाप होईल. यामध्ये पात्र उमेदवारांची शारीरीक मैदानी चाचणी घेण्यात येईल. महिलांची मैदानी चाचणीनंतर पुरुष उमेदवारासाठी 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे, गोळा फेक व महिला उमेदवारांकरीता 100 मीटर धावणे, 800 मीटर धावणे व गोळा फेक घेण्यात येईल.

Share