केवायसी अभावी 4881 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचीत
गोंदिया: नैसर्गिक आपत्तीत पीक, जनावरे, मालमत्तेचे नुकसान झालेल्या पात्र शेतकर्यांना आर्थिक मदत शासनाच्यावतीने थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, जिल्ह्यातील 4 हजार 881 शेतकर्यांची ई-केवायसी झाली नसल्याने त्यांच्यावर मदतीपासून वंचीत राहण्याची वेळ आली आहे.
यामध्ये तालुकानिहाय नुकसान भरपाईपासून वंचित असलेले शेतकर्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक गोंदिया तालुक्यात 2439 शेतकरी, आमगाव 824, तिरोडा 517, गोरेगाव 487, सालेकसा 261, अर्जुनी मोर 186, सडक अर्जुनी 112 व देवरी तालुक्यातील 55 असे 4881 शेतकरी लाभापासून वंचीत आहेत.
जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे घरे, गुरे, साहित्य व पिकांचे नुकसान झाले. प्रत्यक्ष पंचनाम्याअंती नुकसान भरपाईस पात्र शेतकर्यांच्या याद्या प्रमाणित करून संबंधित तहसीलदारांमार्फत संगणकीय प्रणालीवर अपलोड केले जात आहे. अपलोड करण्यात आलेल्या यादीची शासनस्तरावरून पडताळणी होऊन माहितीच्या आधारे लाभार्थ्यांचे नाव, बाधित क्षेत्र, मदतीची रक्कम आदी तपशील दर्शविणारी विशिष्ट क्रमांक यादी संगणकीय प्रणालीद्वारे तयार आहे. जून 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत शेतपिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकर्यांची यादी पोर्टलवर अपलोड करून देण्यात आली. यानुसार पात्र शेतकर्यांच्या बँक खात्यात रक्कम थेट जामा करण्यात आली. मात्र, अजूनही जिल्ह्यातील 4 हजार 881 शेतकर्यांनी ई-केवायसी प्रक्रिया केली नसल्याले या शेतकर्यांची रक्कम बँक खात्यात जमा झाली नाही.
जिल्ह्यात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे 25 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. याचा जिल्ह्यातील 42 हजार शेतकर्यांना फटका बसला. नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाईसाठी 67 कोटी रुपयांचा निधी शासनाने जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. ज्या शेतकर्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली त्या शेतकर्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली. तर 4881 शेतकर्यांची केवायसीची प्रक्रिया झाली नसल्यामुळे 8 कोटी पेक्षा अधिक रक्कम जिल्हा प्रशासनाकडे पडून आहे. पात्र शेतकर्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.