१० हजार लाच घेणे भोवले! गोंदिया पंचायत समितीचा पशूधन पर्यवेक्षकाला अटक

गोंदिया◼️ मांसल कुक्कुट पक्षीगट योजनेअंतर्गत कुकुटपालनाकरिता उभारणी केलेल्या शेडच्या अनुदानाचा दुसऱ्या हप्त्याचा धनादेश काढून देण्याकरिता ३ ऑगस्ट २०२३ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने येथील पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी जयंतप्रकाश ईश्वरदास करवाडे (वय ३९) व खासगी व्यक्ती महेंद्र हगरू घरडे (वय ५०, रा. चुटीया,ता. गोंदिया) यांना अटक केली होती. याच प्रकरणात तिसरा आरोपी तेजलाल हाैसलाल रहांगडाले (वय ५७, पशुधन पर्यवेक्षक, पंचायत समिती गोंदिया) याला लाच रक्कम स्वीकारण्यास मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने अटक केली.
प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत तक्रारदार यांना १००० मांसल कुक्कुट पक्षीगट योजनेअंतर्गत कुक्कुट पालनाकरिता शेड मंजूर झाले होते. तथापि, शासनाकडून मिळणाऱ्या दुसऱ्या हप्त्याचे एक लाख रुपयेचा धनादेश काढून देण्याकरिता १२ हजार रुपयांची मागणी उपरोक्त आरोपींनी केली होती. तडजोडीअंती ११ हजार रुपयांची मागणी करून आता दहा हजार रुपये व धनादेश मिळाल्यावर एक हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान, दहा हजार रुपयांची लाच खासगी व्यक्ती महेंद्र हगरू घरडे यांच्याकडे देण्यास पशुधन विकास अधिकारी जयंतप्रकाश ईश्वरदास करवाडे याने तक्रारदाराला सांगितले. यावरून ४ आॅगस्ट २०२३ रोजी दोन्ही आरोपींविरूद्ध गोंदिया शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.यागुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत उगले यांनी केला. तपासात तिसरा आरोपी तेजराज हौसलाल रहांगडाले याने उपरोक्त दोन्ही आरोपींना लाच स्वीकारण्यास मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली.

Share