राखीव क्षेत्रातून तेंदूपत्ता संकलन, दलाल आणि अधिकाऱ्यांची मोठी सेटिंग?

गोंदिया◼️ ठरवून दिलेले क्षेत्र वगळता राखीव वन क्षेत्रात तेंदूपत्ता संकलनाचे काम जिल्ह्यातील वनक्षेत्रात सर्रास सुरू आहे. या प्रकाराला संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांचेही मूकसंमती असल्याचे बोलले जाते. त्यामुळे वनसंपदा, वन्यप्राण्यांचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. दरवर्षी तेंदूपत्ता संकलनातून कोट्यवधी रुपयांचा निधी वनविभागाला मिळतो. यासाठी टेंडर काढले जातात. मजूर जंगलात जातात, तेंदूपत्ता संकलन करतात आणि तेंदू युनिटमध्ये विकतात. शंभर पुड्यांवर 285 ते 300 रुपये मिळतात. जिल्ह्यात हंगामी रोजगार देणारा सर्वात मोठा असल्याने मजुरांना आर्थिक दिलासा मिळतो. वन विभागाने ठरवून दिलेल्या व निर्धारित वनक्षेत्रातच तेंदूपत्ता संकलन करणे बंधकारक असताना राखीव क्षेत्रातून तेंदूपत्ता संकलन केले जात आहे.  हा प्रकार नवेगाव-नागझिरा अभयारण्याअंतर्गत येणार्‍या मंगेझरी, कोडेबर्रा, बोदलकसा व परिसरात सर्रास सुरू आहे. मजूर मोठ्या संख्येने राखीव क्षेत्रात शिरून तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. जंगलात वाघ, बिबट, अस्वल, रानगवा अशा हिंस्त्रपशुंचा वावर आहे. त्यामुळे मजुरांसह या वन्यजीवांनाही धोका नाकारता येत नाही. वन्यप्राणी-मनुष्य संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी अशीच एक घटना घडली होती. त्यात एका महिलेचा वाघाने जीव घेतला होता. वन्यप्राण्यांचे हल्ले या हंगामात हमखास होत असले तरी, टेंडर घेणारे संबंधित अधिकार्‍यांच्या संगणमताने मजुरांना खुली सुट देत आहेत. मग वन्यप्राण्याने हल्ला केल्यास, जीव गेल्यास जबाबदार कोण? हा प्रश्‍न आहे. 

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी तिरोडा वनविभागाअंतर्गत येणार्‍या राखीव क्षेत्रात तेंदूपत्ता संकलन करणार्‍या काही मजुरांना वनविभागाने पकडले होते. परंतु, टेंडर घेणार्‍याच्या दबावापोटी अधिकार्‍यांनी कारवाई न करता त्यांना अभय दिले. यात मजुरांचा दोष नाही. मात्र, त्यांना राखीव जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी पाठविणार्‍यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतु, अधिकार्‍यांचे पाठबळ असल्यामुळे कारवाई टाळली जात असून, राखीव क्षेत्रात तेंदूपत्ता संकलन करण्यास खुली सूट दिली जात आहे.

राखीव क्षेत्रात मजूर तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात वावर असलेल्या वन्यजीवांपासून मजुरांच्या जीवाला अधिक धोका आहे. सोबतच जंगले विरळ होत असल्याने वन्यजीव गावाकडे मोर्चा वळवित आहेत. त्यामुळे वन्यजीवांची शिकारही होण्याची शक्यता अधिक आहे. सर्वसाधारण क्षेत्रातच तेंदूपत्ता संकलन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मजूर राखीव क्षेत्रात शिरून तेंदूपत्ता संकलन करत असतील तर त्यांना सक्त ताकीद दिली जाईल.

-राघवेंद्र मून, आरएफओ, तिरोडा.

Print Friendly, PDF & Email
Share