‘आरटीई’च्या जागा 14 हजार अन् अर्ज अवघे 477

गोंदिया : शालेय शिक्षण विभागाने यंदा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे पालकांनी प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात 1 हजार 225 शाळांमध्ये प्रवेशासाठी 14 हजार 339 जागा आहेत. केवळ 477 विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले. गोंदियातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यात आरटीई प्रती पालकांची उदासिनता पाहता शिक्षण विभागाने अर्ज नोंदणीसाठी 10 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तरीही यंदा आरटीई प्रवेशाच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आरटीई प्रवेशांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया 16 एप्रिलपासून सुरू करण्यात झाली. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल होती. मात्र आरटीई प्रवेश प्रक्रियेतून खासगी विनाअनुदानित शाळा, विशेषत: इंग्रजी शाळा वगळण्यात आल्याने पालकांनी प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे. या पार्श्‍वभूमीवर 10 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तब्बल दोन महिन्याच्या विलंबानंतर सुरू झालेली आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरूवातीपासूनच वादाच्या भोवर्‍यात सापडली. पाल्याच्या प्रवेश निश्‍चितीसाठी पालकांना एक किलोमीटर परिघातील शासकीय व अनुदानित शाळांनाच प्राधान्य द्यावे लागत आहे. अर्ज प्रक्रियेतही नामांकित शाळा निवडता येत नसल्याने नोंदणीत पालकांचा निरूत्साह दिसून येत आहे.

मागील शैक्षणिक वर्षापर्यंत पालकांकडून आरटीई ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत होता. उपलब्ध जागांच्या तुलनेत प्राप्त अर्जांची संख्या अधिक असल्याने प्रत्यक्ष प्रवेश देताना कसोटी लागत होती. त्यासाठी लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जात होती. मात्र यंदा अर्ज नोंदणीला अल्प प्रतिसाद आहे. उपलब्ध जागांच्या तुलनेत फार कमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे लॉटरी पद्धत बंद होण्याची शक्यता आहे.

Share