नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची दहशतवाद्यांची धमकी

नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली असून धमकीमध्ये दहशतवाद्याने विमाने स्फोटकाने उडवून देण्याचा इशारा दिला आहे.

ही धमकी सोमवारी सकाळी ९.४५ वाजता विमानतळ व्यवस्थापनाला इ-मेलद्वारे देण्यात आली. धमकीचा मेल आल्यानंतर विमानतळ प्रशासनात घबराट पसरली असून सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

बॉम्बच्या धमकीमुळे विमानतळ व्यवस्थापन चिंतेत तर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) आणि स्थानिक पोलिसांनी विमानतळावर तातडीने शोधमोहीम सुरू केली. पण कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. सोमवारी देशातील अनेक विमानतळांवर धमकीचे मेल आल्याचे विमानतळ प्रशासनाशी संबंधित सूत्रांनी सांगितले. जयपूर, आगरतळा, श्रीनगर, चंदीगड आणि वाराणसी विमानतळ व्यवस्थापनालाही असे मेल पाठवल्याची माहिती आहे. या मेलमध्ये सर्व विमानतळांवर बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली आहे.

मेलद्वारे मिळालेल्या धमकीची माहिती प्रारंभी विमानतळाची सुरक्षा करणारे सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिसांना देण्यात आली. सुरक्षेच्या तातडीने उपाययोजना करीत विमानतळाची शोधमोहिम हाती घेतली. बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकासह इतर सुरक्षा यंत्रणांनी विमानतळाची तपासणी केली. सध्या विमानतळावर कडक सुरक्षा असून प्रवाशांना तपासणीनंतरच आत सोडण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विमानतळावर पोलिसांची १५-१५ ची दोन पथके तैनात केली आहेत. परिसरातील घडामोडींवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. संशयितांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

धमकीचा मेल मिळाला, विमानतळाची तपासणी : 
धमकीचा मेल सकाळी ९.४५ वाजता मिळाला. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी आणि सीआयएसएफ व स्थानिक पोलिसांना देण्यात आली. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने विमानतळाची तपासणी केली. त्यात संशयास्पद असे काहीही आढळले नाही. सुरक्षा यंत्रणांची विमानतळावर बारीक नजर असून सर्वांची तपासणी करण्यात येत आहे.

Share