७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात गडचिरोली व गोंदिया सी ६० पथकाने पटकाविला प्रथम क्रमांक

Mumbai  : देशात दरवर्षी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी विविध सुरक्षा दलांच्या जवानांच्या पथसंचलनाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात देखील पोलिस दलातील विविध घटकांतील पथके आपल्या शिस्तीचे, एकजुटीचे प्रदर्शन पथसंचलनाच्या माध्यमातून २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी दाखवितात. २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत झालेल्या पथसंचलनात भाग घेतलेल्या पथकांमधील उत्कृष्ट पथसंचलन केलेल्या पथकांना शासनातर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्याकरिता गठित करण्यात आलेल्या निवड समितीने उत्कृष्ट पथसंचलनासाठी अनुक्रमे प्रथम क्रमांक गडचिरोली आणि गोंदिया सी-६० पथक, द्वितीय क्रमांक राज्य राखीव पोलिस बल व तृतीय क्रमांक बृहन्मुंबई पोलिस दंगल नियंत्रण पथक अशा तीन पथकांची निवड करण्यात आली आहे.

गडचिरोली पोलिस दल व गोंदिया पोलिस दलाच्या सी ६० पथकाने संयुक्तरित्या सर्वोत्कृष्ट पथसंचलन करुन २६ जानेवारी २०२४ रोजी शिवाजी पार्क दादर, मुंबई येथे महामहिम राज्यपाल यांचे उपस्थितीत झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनामध्ये प्रथम क्रमांक पटकविला, त्याबद्दल सर्व स्तरातून गडचिरोली पोलिस दलाचे अभिनंदन केले जात आहे.

प्रजासत्ताक दिन पथसंचलनामध्ये सर्वोत्कृष्ट पथसंचलन करणाऱ्या पथकांना आज  २९एप्रिल २०२४ रोजी अपर पोलिस महासंचालक  प्रशासन म. रा. मुंबई यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. गडचिरोली पोलिस दलाचे सी ६० पथके माओवादविरोधी कारवायांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत असतात. त्यासोबतच पथसंचलनामध्ये देखील त्यांनी आपल्या शिस्तीचे आणि एकजुटीचे प्रदर्शन दाखवून दिले आहे. त्याबद्दल गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल  यांनी पथसंचलनात पथक प्रमुख पोनि, कुंदन गावडे, पोउपनि, कृष्णा साळुंखे व जवानांचे कौतुक करत भविष्यात अशीच कामगिरी करण्याबाबत शुभेच्छा दिल्या.

Print Friendly, PDF & Email
Share