विहिरीत पडलेल्या गायीला हेल्पिन ग्रुपने दिले जीवदान
देवरी◼️तालुक्यातील ग्राम परसटोला डेपो शिवारातील शालिक मडावी या शेतकऱ्याच्य शेतीमध्ये तोंडी नसलेल्या विहिरीमध्ये अचानक पडलेल्या गाईला देवरी येथील कार्यरत सामाजिक संघटना हेल्पिंग बॉईज ग्रुपच्या सदस्यांनी विहिरी बाहेर काढून जीवदान दिले. त्यामुळे हेल्पिंग बॉईज ग्रुपच्या सदस्यांचे तालुक्यात सगळीकडे कौतुक होत आहे.
सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील ग्राम परसटोला/डेपो जंगल शिवारातील शालीक मडावी या शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकाला सिंचनाच्या सोयीकरिता विहीर खोदकाम पूर्णपणे केले. परंतु, ती विहीर भुईसपाट असून, जमिनीपासून वर उंचापर्यंत विहिरीला तोंडी तयार करण्यात आले नाही. शेतजमीन जंगल परिसराला लागून असल्यामुळे, त्याच परिसरातील एक गाय चरत असताना, तोल जाऊन आज सकाळी विहिरीमध्ये पडली. ही बाब हेल्पिंग ग्रुपच्या एका सदस्याच्या निदर्शनात आल्यावर त्यांनी बाकी सदस्यांना माहिती दिली. लगेच हेल्पिंग ग्रुप देवरीच्या सदस्यांनी ग्राम परसटोला डेपो जंगल शिवारातील विहिरीकडे धाव घेऊन, हायड्राच्या मदतीने गाईला बाहेर काढून नव्याने जीवदान दिले. त्यामुळे संपूर्ण देवरी तालुक्यात हेल्पिंग ग्रुपच्या सदस्यांचे कौतुक होत आहे. हेल्पिंग ग्रुपच्या सदस्यांनी सर्वप्रथम ही बाब वन विभागाला कळविली मात्र गाय ही वन्यजीव नसल्यामुळे वन विभागाने कानाडोळा केला आहे .तसेच नगरपंचायत प्रशासनाला कळवून नगरपंचायत प्रशासनाने सुद्धा याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे कशाचीही पर्वा न करता सचिन भांडारकर, इलियाज कुरेशी, सुजित अग्रवाल, सोमण चौहान,बाळकृष्ण राऊत, तसेच गावातील स्थानिक अजय मडावी, सत्येंद्र नरेटी, गणपत मडावी, सुनील सोनुले, गोविंद उईके, ई यांनी अथक परिश्रम करत सदर गाईला जीवनदान दिले.