43 मतदान केंद्र महिलांच्या हाती

गोंदिया◼️देशातील लोकशाही प्रणालीत 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा मुलभूत अधिकार आहे. मतदान करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य असताना कित्येक महिला पुरुषांच्या गर्दीत जाण्याचे टाळत मतदानाचा हक्क बजावत नाही. प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजवावा यासाठी महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जिल्ह्यातील 43 मतदान केंद्रांचे नियंत्रण पूर्णपणे महिलांच्या हाती राहणार आहे. उल्लेखनिय म्हणजे येथील अधिकार्‍यांपासून ते कर्मचार्‍यांपर्यंत सर्व जबाबदारी महिला पार पाडणार आहेत.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आजची महिला ही पुरुषांपेक्षा कमी नसून त्यांच्या बरोबरीने काम करीत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त असूनही प्रत्यक्ष मतदानात मात्र महिलांना मागे टाकून पुरुषांची टक्केवारी नेहमीच जास्त असल्याचे दिसून येते. पुरुषांच्या गर्दीत जाऊन मतदान करण्यापेक्षा घरीच रहावे हा विचार करुन कित्येक महिला राष्ट्रीय कर्तव्य बजावत नाही. एकीकडे जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी शासन व प्रशासनाकडून विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. बहुतांश महिला मतदानाचा हक्क बजावत नसल्याचे निदर्शनास आले आहे. महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे व त्यांच्या मनात असलेली शंका काढून टाकावी यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील 43 मतदान केंद्र महिलांच्या सुपूर्द केले आहे. येथील सर्व जबाबदारी महिलाच सांभाळणार आहेत. ज्या मतदान केंद्रात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी महिला मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

Share