गोंदिया जिल्हात वादळासह अवकाळी पाऊस
◼️देवरी तालुक्यात अवकाळीचा फटका
गोंदिया: जिल्ह्यासाठी हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला होता. तो खरा ठरवत मंगळवार 9 आणि 10 एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी पावसाने मेघ गर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार तुफानी वाऱ्यांनीहजेरी लावली. यामुळे कापणीला यालेला गहू, मका पिकासह फुलोर्यावरील उन्हाळी धान, भाजीपाला, आंबा पिकाला फटका बसला आहे.
हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. दिवसभर कडक ऊन तापल्यानंतर सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल होऊन वादळाला सुरुवात होत आहे. काही भागात पावसाच्या सरी तर काही भागात तुरळक पावसाची नोंद होत आहे. सोमवारीही रात्री काही भागात वादळ, मेघगर्जनेसह तुरळक हजेरीनंतर मंगळवारी दिवसभर ऊन सावल्यांचा खेळ पहावयास मिळाला. रात्री 10 नंतर काळे ढग व सोसाटाचा वारा सुटला. पहातापहाता रात्री साडेअकरा वाजता वादळ, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. यावेळी अनेक भागात विज पुरवठा खंडीत झाला. अनेक गावांत अंधाराचे साम्राज्य पसरले. पावसामुळे रब्बी पिकांसह, उन्हाळी धान, मका, आंबे, मोहफुल संकलनाला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अवकाळीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला मात्र, दुसरीकडे वादळ व पावसामुळे लग्न समारंभ असलेल्या वधू-वर मंडळी व निवडणूकीच्या धामधुमीत असलेल्या उमेदवारांसह पक्षाचे पदाधिकार्यांचे टेंशन वाढले आहे. आजही सकाळी 6 च्या दरम्यान अनेक भागात वादळ, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे.