बस चालक वाहकांना अडीच वर्षांपासून ना गणवेश, ना कापड

गोंदिया : एसटी महामंडळातील चालक व वाहकांना गत अडीच वर्षांपासून गणेवश पुरविण्यात आले नाही. त्यामुळे गणवेश घातला नाही तर कारवाई कशी करता? असा प्रश्‍न कर्मचार्‍यांनी उपस्थित केला आहे.

अनेक चालक, वाहक कर्तव्यावर असताना गणवेश घातल नाही. तसेच काहीजण मद्यप्राशन करुन गाडी चालवित असल्याचे प्रकार आढळून आल्याचे राज्य परिवहन महामंडळाने म्हटले आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकार्‍यांना याबाबत तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. चालकाला मार्गावर जाण्यासाठी वाहन देताना त्याने मद्यप्राशन केलेले नाही, याची तपासणी करुन व तशी नोंद शेरावहीत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

त्याप्रमाणे चालक व वाहकांनी पूर्ण गणवेशात असणे आवश्यक आहे. गणवेश ही कर्मचार्‍यांची शान आहे, त्यांनी त्यांचे कर्तव्य गणवेशातच पार पाडायला पाहिजे, तसे आदेशही आहेत. परंतु महामंडळाकडून गणवेश पुरविला जात नाही. महामंडळाकडून कर्मचार्‍यांना वर्षात दोन गणवेश किंवा कापड दिले जायचे. परंतु गत अडीच वर्षांपासून कापड किंवा गणवेश मिळाले नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांना जुने गणवेश घालून किंवा स्वखर्चाने गणवेश विकत घेऊन कामावर जावे लागते. काही कर्मचारी स्वतः कापड खरेदी करुन गणवेश शिवून कामावर जातात. याशिवाय एकच गणवेश असेल तर तो धुण्याचाही प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे गणवेश नसलयास कारवाई करण्याच्या संकटाला कर्मचार्‍यांना सामोरे जावे लागते.

Share