हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसमधून 14.50 किलो गांजा जप्त

गोंदिया: रेल्वे सुरक्षा दल व विशेष टाक्स फोर्सने 8 एप्रिल रोजी रात्री 7 वाजता हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये 14.50 किलोग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई आमगाव ते गोंदिया प्रवासादरम्यान करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेतून अवैधरित्या अंमली पदार्थ, पैसे आदींची वाहतूक रोखण्यासाठी रेल्वे विभागाद्वारे ऑपरेशन नार्को राबविण्यात येत आहे. यातंर्गत गोंदिया रेल्वेस्थानकाचे सुरक्षा दलाचे निरीक्षक व्ही. के. तिवारी यांच्या मार्गदर्शनात रेल्वे सुरक्षा दल व विशेष टाक्स फोर्स जिल्ह्यातून जाणार्‍या रेल्वेमार्गावर विशेष तपास मोहिम राबवित आहे. यातंर्गत 8 एप्रिल रोजी हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसच्या इंजिनमागील तिसर्‍या साधारण श्रेणी डब्ब्यात एका सिटखाली 3 बॅग बेवारस पडलेल्या आढळला. डब्ब्यातील प्रवाशांनी सदर बॅग आपल्या नसल्याचे सांगितले. दरम्यान रेल्वे पोलिसांनी बॅग उघडून पाहिल्या असता आत सात बॉक्समध्ये 2 लाख 90 हजार 680 रुपये किमतीचा 14.50 किलोग्रॅम गांजा आढळला. दरम्यान गोंदिया रेल्वेस्थानकावर जप्त केलेला गांजा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून याप्रकरणी अज्ञात आरोपींवर एनडीपीए कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Share