यंत्रणांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे : जिल्हाधिकारी प्रजित नायर

गोंदिया◼️लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार लोकसभा निवडणूक भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणांनी संवेदनशीलपणे कामे करुन आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील नोडल अधिकार्‍यांची बैठक घेवून निवडणुकीसंदर्भात माहिती दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी नायर म्हणाले, निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रोकड वाहतूक व दारुच्या वाहतुकीवर कडक निर्बंध घालण्याच्या सूचना पोलिस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आल्या आहे. आचारसंहितेचे जिल्ह्यात कुठेही उल्लंघन होणार नाही यासाठी पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेचा चोखपणे बंदोबस्त ठेवावा. उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर बारकाईने लक्ष्य केंद्रीत करुन मतदान केंद्रावर योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. निवडणूक कालावधीत भरारी पथक व स्थीर स्थायी पथक यांच्यामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. निवडणूक यंत्रणेत काम करतांना प्रत्येकाने निवडणुकीच्या अटी व नियमांचे वाचन करुन पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी सभेत दिले.

Print Friendly, PDF & Email
Share