वन्यप्राण्यांना जुन्याच पाणवठ्यांचा आधार, पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती

♦️नव्या पाणवठ्याची निर्मिती नाही, शिकाऱ्यांपासून वन्यप्राण्यांना धोका

गोंदिया: वन्यजीवांच्या पाण्याची व्यवस्था जंगलातच व्हावी, याकरिता वनविभागाकडून जंगल परिसरात काही ठिकाणी कृत्रिम तर कुठे नैसर्गिक पाणवठे तयार केले आहेत. मात्र, हे पाणवठे आता जुने झाले असून वन्यप्राण्यांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, यंदा नव्या पाणवठ्यांची निर्मितीच झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या वन्यप्राण्यांना जुन्याच पानवठ्यांचा आधार आहे. दिवसेंदिवस सूर्य आग ओकू लागल्याने जीवाची लाहीलाही होत आहे. वन्यजीवांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात व्याघ्रप्रकल्पाचे जंगल सोडून इतरत्र भटकंती करताना दिसत आहे.

जिल्ह्यात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. वन विभागाची ५६ वर्तुळे असून २७४ बीट आहेत. तर गोंदिया, गोरेगाव, आमगाव, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोठणगाव, उत्तर देवरी, दक्षिण देवरी, तिरोडा सालेकसा, नवेगावबांध व चिचगड असे १२ वनक्षेत्र आहेत. २ लाख ५४ हजार २८८ हेक्टर क्षेत्रफळ वनक्षेत्रात येत असताना पैकी १ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रफळ वन विभागाच्या अखत्यारीत येतो. त्याच बरोबर वन्यजीव विभागाचे नागझिरा, न्यु नागझिरा, नवेगाव, बोंडे, डोंगरगाव, पिटेझरी, उमरझरी, कोका असे रेंज आहेत. तर वन विकास महामंडळाचेही जंगल क्षेत्र बऱ्याच पैकी आहे. त्यात या जंगलात वाघ, अस्वल, विबट, निलगाय, रानगवा, रानडुक्कर ससे, हरीण आदी वन्य प्राण्यांच्या अधिवास आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गाव व शहराच्या दिशेने आपला मोर्चा वळवित असतात. यात वन्यजीव व मानव असे संघर्षांच्या घटनाही घडतात. विशेषतः अर्जुनी मोरगाव तालुका जंगल परिसराने व्यापलेला असून या तालुक्यात अनेकदा वाघ अथवा बिबट्याकडून पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडत असतात. दरम्यान, वन्यप्राण्यांना जंगल परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी कृत्रिम व नैसर्गिक जलसाठ्याची निर्मिती करण्यात येते यात बिंधन विहीरींची निर्मीती करून त्यावर सोलरपंपाच्या माध्यमातून पाणवठ्यात पाणी सोडण्यात येते यावर वन्यजीवही मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे दिसून येते. असे असले तरी मागील ४ ते ५ वर्षांपासून या पाणवठ्यात वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे जून्याच पाणवठ्यांवर या वन्यजिवांची तहान भागत आहे.

वनव्याची भीती कायमचीच

जंगलात वन्यप्राण्यांना एकीकडे पिण्याचे पाणी मिळत नसताना दुसरीकडे वनव्याच्या घटनांचीही भीती लागलेली असते. मागील काही वर्षांच्या घटनांवर लक्ष टाकल्यास हजारो हेक्टर जंगल वनव्याने फस्त केला आहे. त्यात वन विभागाकडून शून्य टक्के नुकसान दाखविण्यात येत असले तरी अनेक प्राण्यांचे जीव यात जात असल्याचे वास्तव आहे

शिकाऱ्यांपासून वन्यप्राण्यांना धोका

उन्हाळ्याच्या दिवसांत वन्यप्राणी पाणवठ्यावर येत असल्याची संधी साधून शिकारीही आपला ठिय्या मांडून बसतात, त्यामुळे या पानवठ्यात विषप्रयोग होण्याची शक्यता असल्याने वनविभागाने पथक नियुक्त केले आहे. हे पथक सर्व पाणवठ्यावर वेळोवेळी पाहणी करत असून, २ ते ३ दिवसांनी पाण्याची तपासणी केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, मागील गेल्या काही महिन्याचा आलेख पाहता जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना सातत्याने घडल्याचे दिसत असून संबंधित विभागाच्या कार्यावरही प्रश्न निर्माण होत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share