वनविभागात ‘रेड अलर्ट’ जारी, देवरी तालुक्यातील जंगल परिसरात लागला वणवा!

देवरी ◼️वनविभागाच्या अखत्यारितील जंगलात तापमानात वाढ होताच आगीच्या घटनांना सुरुवात झाली आहे. उपाययोजना म्हणून जंगलातील जाळरेषा जाळण्याचे काम संपले असून, आता आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी वनाधिकारी ते क्षेत्रीय कर्मचार्‍यांपर्यंत ‘अलर्ट’ राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 15 जूनपर्यंत ‘रेड अलर्ट’ असून जंगलात आग विझवण्यासोबतच नागरिकांच्या सहकार्याने आग लागूच नये, अशी खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत. मात्र देवरी तालुक्यातील आमगाव देवरी महामार्गालगत जंगल परिसरात जोरदार वणवा लागला असल्याचे चित्र बघावयास मिळाले. यावरुन वनविभागाच्या “रेड अलर्ट” ही संकल्पना चर्चेचा विषय ठरली आहे. 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल असून वन्यप्राण्यांचे अधिवास आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात नैसर्गिक व मानवनिर्मित आग लावल्याने हजारो हेक्टर जंगलाची दरवर्षी राखरांगोळी होते. यात सरपटणार्‍या प्राण्यांपासून जंगली प्राण्यांचा होरपळून मृत्यू होतो. कोट्यवधी रुपयांची वनसंपदा नष्ट होत असताना पर्यावरणाचे सर्वाधिक प्रमाणात नुकसान होते. जंगलात लागणार्‍या आगी मानवनिर्मित व नैसर्गिक असतात. आतापर्यंतच्या पाहणीत आगी मानवनिर्मितच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या आगी रोखण्यासाठी क्षेत्रीय वनकर्मचारी व वनाधिकारी यांनी गावागावांत बैठका घेऊन जनजागृती करुन वनव्यवस्थापन समित्या व गावातील नागरिकांचे सहकार्य घेण्याच्या सूचना वनविभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. वन वणवा हंगामातंर्गत जाळरेषा कापणे व जाळणे ही आगीपासून संरक्षण मिळवणारी कामे प्रत्येक वनक्षेत्रातील वनखंड ते जिल्हा व आंतरराज्य महामार्गावरील जंगलातील सीमारेषेवर करण्यात आली. प्रत्येक वनखंडात 6 मीटर, आंतरराज्य व जिल्हा सीमारेषेवर 12 मीटरपर्यंत जाळरेषा जाळण्यात आल्या. लागलेली आग पुढे पसरु नये, यासाठी अखंड गवताच्या परिसरात रस्त्याच्या आकाराचा काडीकचरा जाळण्यात येतो, त्याला जाळरेषा म्हणतात. हे काम संपल्याचे वनाधिकार्‍यांनी सांगितले आहे.

सॅटेलाईटहून आगीची माहिती

वनकर्मचार्‍यांना जंगलात आग लागल्याची माहिती ठेवण्यासोबतच ती कुठे लागली ही नोंद ठेवणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर संबंधित उपवनसंरक्षक व वरिष्ठ अधिकार्‍यांना सर्वे ऑफ इंडियाकडून सॅटेलाईटद्वारे माहिती पाठविली जाते. परंतु काही वर्षात काही भागात जंगलात आग लागण्याचे प्रमाणे वाढल्याचे दिसत आहे, ते थांबविण्यासाठी निसर्गप्रेमींनी पुढे येणे गरजेचे आहे.

Share