अशोक नेते यांना पुन्हा संधी, जाणून घ्या खानावळ पासून खासदार पर्यंतचा प्रवास
देवरी २४ : मेस चालविणारा एक सामान्य माणूस गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त, आदिवासी, अतिदुर्गम भागात एका पक्षाच्या विचारधारेशी जुळतो आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करून प्रचंड मेहनत घेतो. सामान्य लोकांशी नाळ बांधून त्यांना आपलेसे करतो अन् हळूहळू यशस्वी राजकीय वाटचाल करतो. आदिवासींना सर्वांगीण विकासाचे स्वप्न दाखवीत ते पूर्ण करण्यासाठी जिवाचे रान करतो आणि त्यांचा शिलेदार होतो. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविणारे खासदार अशोक नेते यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. गेल्या ३० वर्षांपासून सक्रिय राजकारण करताना ते दोनदा आमदार झाले. नंतर त्यांनी आपले कार्यक्षेत्र वाढविले. ते आता दुसऱ्यांदा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत.
नाव : अशोक महादेवराव नेते
जन्मतारीख : 1जुलै 1963
शिक्षण: पदवीधर
कौटुंबिक पार्श्वभूमी :
नागपूर जिल्ह्यातील बराडपौनी या गावात अशोक नेते यांचा जन्म झाला. अशोक नेते यांच्या मातोश्रींचे नाव गुणादेवी आणि वडिलांचे नाव महादेवराव आहे. अशोक नेते अतिशय सामान्य कुटुंबातून समोर आले. त्यांच्या पत्नीचे नाव अर्चना आहे. 1998 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांना अक्षिता व आशिता या दोन मुली आहेत. एक मुलगा आहे. अर्णव असे त्याचे नाव आहे. हे तिघेही सध्या शिक्षण घेत आहेत.
नोकरी किंवा व्यवसाय
शेती आणि व्यवसाय.
लोकसभा मतदारसंघ कोणता?
गडचिरोली-चिमूर
आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढवल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास?
नागपूर जिल्ह्यातील एका गावातून अशोक नेते आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू नामदेव गडचिरोली येथे आले. तेथे अशोक नेते यांनी खानावळीचा व्यवसाय सुरू केला. मृदू स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीत ग्राहकांची मने जिंकली. या व्यवसायातून त्यांचा संपर्क राजकीय क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांशी आला. अनेकांच्या सुखदुःखाचे ते भागीदार झाले अन् यातूनच त्यांची भाजपशी जवळीक निर्माण झाली. यानंतर त्यांनी राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपल्या कामाला सुरुवात केली. व्यवसायासोबत ते सक्रिय राजकारण करू लागले. त्यांच्यातील क्षमता, त्यांची काम करण्याची पद्धत बघून पक्षाने त्यांना 1995 मध्ये भाजयुमोच्या गडचिरोली तालुकाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. अशोक नेते यांनी या संधीचे सोने केले.
1997 मध्ये त्यांना भाजपच्या आदिवासी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. या काळात संपूर्ण जिल्हा त्यांनी पिंजून काढला. गावागावांत संघटन बांधणी करून आदिवासी बांधवांना नवी प्रेरणा दिली. त्यांच्या या कार्याची दखल राज्यातील पक्षनेतृत्वाने घेतली आणि त्यांना 1999 मध्ये गडचिरोली विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली. मिळालेल्या संधीचे अशोक नेते यांनी सोने केले. आपल्या आयुष्यातील पहिली निवडणूक त्यांनी जिंकली अन् येथूनच त्यांची राजकीय कारकीर्द अधिक फुलली.
2004 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी बाजी मारत विरोधकांना जोरदार धक्का दिला. दरम्यानच्या काळात त्यांनी आदिवासी आघाडीच्या प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत अशोक नेते यांना मोठा धक्का बसला. या निवडणुकीत अवघ्या 960 मतांनी त्यांचा पराभव झाला, पण नेते पराभवाने खचले नाहीत. त्यांनी या काळात पक्षवाढीसाठी निरंतर प्रयत्न केले. गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी अथक प्रयत्न करून हजारो तरुणांना भाजपशी जोडले.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील राजकीय संदर्भ बदलले अन् अशोक नेते यांना गडचिरोली लोकसभा मतदारसंघांची उमेदवारी मिळाली. मतदारसंघातील गावागावांत त्यांनी प्रचाराची प्रभावी यंत्रणा राबविली. त्यांचा ऐतिहासिक विजय झाला. सव्वादोन लाख मतांच्या फरकाने अशोक नेते लोकसभा निवडणूक जिंकले. स्वतः लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करताना त्यांनी आपल्या तीन सहकाऱ्यांना विधानसभेवर निवडून आणले.
2015 मध्ये अशोक नेते यांना केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नेतेंच्या कामाची दखल घेत त्यांना आदिवासी आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद बहाल केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखविला. तो सार्थ ठरवित त्यांनी पुन्हा एकदा भाजपला या मतदारसंघातून विजय मिळवून दिला. गडचिरोली लोकसभा मतदारसंघ व संपूर्ण विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचेच प्राबल्य आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील गरजू, आदिवासींना आरोग्याची सुविधा निर्माण करण्यासाठी गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. आदिवासी समाजाला एकसंघ करण्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील गावागावांत अभियान सुरू केले. अतिशय संयमी असलेले अशोक नेते यांचा मृदुभाषी असलेला स्वभाव त्यांच्या संपूर्ण वाटचालीत महत्त्वाचा ठरला. जे काम हाती घेतले ते कोणत्याही परिस्थितीत झाले पाहिजे, ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. सामान्यातला सामान्य माणूसही त्यांची सहजपणे भेट घेऊ शकतो. त्यांना आपली आपबिती सांगतो व आपल्या समस्यांचे निराकरण करून घेतो. यावरून अशोक नेते यांच्या लोकप्रियतेची प्रचिती येते.
2019 मध्ये निवडणूक लढवली होती का? त्याचा निकाल काय लागला?
2019 मध्ये अशोक नेते यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांना 5 लाख 19 हजार 968 मते मिळाली होती. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांचा पराभव केला होता. या लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा विजयी झाले आहेत. दोन्ही वेळा त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नामदेव उसेंडी उमेदवार होते.
2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती?
2019 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झाला होता. संपूर्ण देशात असलेली मोदी लाट, अशोक नेते यांची मतदारसंघावर असलेली पकड, 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी मतदारसंघात केलेली विविध विकासकामे, गावागावांतील मतदारांशी त्यांचे असलेले थेट संबंध या आधारावर त्यांना विजय मिळविता आला. अशातच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने लाखाहून अधिक मते घेतल्याने त्याचा थेट फायदा अशोक नेते यांना झाला.
मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे?
अशोक नेते यांनी खानावळीच्या व्यवसायातून आपली वाटचाल सुरू केली होती. यानंतर त्यांनी गडचिरोलीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल सुरू केले. यानंतर ते सक्रिय राजकारणात आले. दोनदा आमदार व दोनदा खासदार होण्याची संधी त्यांना मिळाली. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांनी लोकांशी नाळ बांधून ठेवली. गडचिरोली -चिमूर मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा आहे. त्यांच्या कार्यालयात दररोज असणारी मोठी गर्दी त्यांच्या लोकप्रियतेची व जनसंपर्काची प्रचिती देऊन जाते.
राजकीय गुरू कोण?
खानावळीचा व्यवसाय करता-करता अशोक नेते राजकारणात आले. ते स्वयंभू नेते आहेत. मृदू स्वभाव, मितभाषी वा सदैव हसतमुख असलेले अशोक नेते लोकांत मिसळतात. त्यांना आपलेसे करतात. लोकांची कामे करताना जी कामे हाती घेतात, ती पूर्ण करतातच, हा विश्वास लोकांना आहे. मतदारसंघातील मतदारांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा त्यांनी मिळविलेला विश्वास या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.