लाखो क्विंटल धान उघड्यावर
गोंदिया ⬛️: जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन एजेंन्सींच्या माध्यमातून सब एजंट संस्थांनी हमीभाव केंद्रावरून 25 लाख क्विंटल पेक्षा अधिक धान खरेदी केले आहे. परंतु, साठवणुकीसाठी पर्याप्त गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदी केलेला धान उघड्यावर पडून आहे.जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे उघड्यावर पडून असलेल्या धानाची सुरक्षा ताडपत्रीच्या भरवशावर असून धान पाण्यात सापडल्यास कोट्यवधीचे नुकसान होणार असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकर्यांकडून धान खरेदी करण्यात आले. यंदाच्या खरीप हंगामात 32 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्ट पूर्तीअभावी धान खरेदीची मुदत वाढविण्यात आली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन प्रमुख एजंन्सीच्या नियंत्रणाखाली सब एजंट संस्थानी धान खरेदी प्रक्रिया राबविली. यादरम्यान जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकर्यांनी 25 लाख क्विंटल पेक्षा अधिक धान हमीभाव केंद्रात विक्री केले. मात्र शासन आणि राईस मिलर्स यांच्यातील असलेला तिढा सुटला नाही. यामुळे भरडाईसाठी असलेला धान अनेक धान राईस मिलर्सकडून उचल करण्यात आला नाही.
याचा फटका यंदाच्या हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाला बसत आहे. जिल्ह्यातील अनेक गोदाम भरलेली असून अनेक केंद्रावर खरेदी करण्यात आलेला धान केंद्राच्या आवारात पडून आहे. ताडपत्री झाकून संस्था संचालक व ग्रेडर मोकळे झाले आहे. या प्रकाराने धानाची सुरक्षा वार्यावर आहे. असे असतानाच मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. 19 मार्च रोजी अर्जुनी मोरगाव सडक अर्जुनी तालुक्यात गारपीटीसह अन्य तालुक्यात पाऊस झाला. अशा परिस्थितीत केंद्रात उघड्यावर पडून असलेला धानाची सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. अवकाळी पावसाने धान भिजून मोठी घट येणार, असे चित्र दिसत आहे. यामुळे शासनाला कोट्यवधीचा नुकसान होणार असून धानाची सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीत जिल्ह्यातील हमीभाव केंद्रावर धानाची सुरक्षा ताडपत्रीच्या भरवशावर असल्याचे सदृश्य चित्र निर्माण झाले आहे.
हमीभाव केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाच्या सुरेक्षाचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. शेतकर्यांकडून खरेदी करण्यात आलेला धान केंद्रात ताडपत्री झाकून उघड्यावर पडून राहतो. त्यामुळे मोकाट जनावरे, अवकाळी पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात घट येणार आहे. खरेदी केलेल्या धानाची पुरेपूर उचल करण्यात येत नसल्याने, दरवर्षी हजारो क्विंटल धान पावसामुळे खराब होते आहे आणि त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. असे असले तरी उपाययोजनेकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे घट भरून काढण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.