अखेर चार वर्षानंतर ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ सुरु

गोंदिया⬛️ गर्भलिंग निदान प्रतिबंध, लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्याकरिता व स्त्री भ्रूण हत्या रोखण्याकरिता राज्यात तक्रार नोंदविण्यासाठी ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले होते. मागील चार वर्षापासून हा संकेतस्थळ बंद होता. आज 15 मार्च रोजी हे संकेतस्ळ पुन्हा सुरू करण्यात आले. यामुळे गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा 1994 सुधारित कायदा 2003 (पीसीपीएनडीटी आणि एम.टी.पी) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मदत होणार आहे.

गर्भलिंगनिदानाबाबत तक्रार करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (यूएनएफपीए) संस्थेने सन 2011 मध्ये ‘आमची मुलगी’ वेबसाइट सुरू करण्यात आली. तांत्रिक व आर्थिक कारण पुढे करून चार वर्षापुर्वी ‘आमची मुलगी’ ही वेबसाइट बंद करण्यात आली. शासनाने मोठ्या दिमाखात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान हाती घेतले. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. असे असताना प्रसूतीपूर्व गर्भलिंगनिदान अनधिकृतपणे होत असल्यास तक्रार करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ बंद पडल्याने शासनाच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. परिणामी तक्रार कोठे नोंदवायची? असा प्रश्नही उपस्थित होत होता. पीसीपीएनडीटी आणि एमटीपी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता विविध उपक्रम आणि उपाययोजना यशस्वीपणे राबविण्यासाठी विविध योजनांची कार्यवाही करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा 1994 सुधारित कायदा 2003 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यात तक्रार नोंदविण्यासाठी तसेच याविषयी कुठल्याही शंकेचे निरसन करण्यासाठी हीींिं://रालहर्ळाीश्रसळारहर.ळप/ हे नवीन संकेतस्थळ आज शुक्रवारी सुरु करण्यात आले.

संकेतस्थळावर तक्रार नोंदविल्यास त्याचे नाव गोपनीय राहील. तक्रारकर्त्याची इच्छा असल्यास नाव नोंदवू शकतील. पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत तक्रार निपटारा होऊन गर्भलिंग निदान करणार्‍या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तक्रारीची अंमलबजावणी होऊन जर स्त्री भ्रूण हत्या रोखण्यास यश आले, तर तक्रारदारास शासनामार्फत खबरी बक्षीस योजनेअंतर्गत रक्कम 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. कुठेही गर्भलिंग निदान होत असल्यास नागरिकांनी वरील संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, जन्म लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यास सक्रिय सहभाग द्यावा, असे जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share