मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाकडे गोंदिया जिल्हातील शाळांनी फिरवली पाठ

⬛️ जिल्हात फक्त २९% नोंदणी, शिक्षणाधिकाऱ्याचे दालनात खुलासा देण्याचे मुख्याध्यापकांना पत्र

⬛️अतिरिक्त अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामामुळे शिक्षकांना वैताग

गोंदिया⬛️ ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत ऑनलाइन माहिती भरण्यास शाळांनी कमालीची उदासिनता दाखविली असून नोंदणी करण्याकडे पाठ फिरवल्याचे गोंदिया जिल्हासह राज्यात चित्र पहायला मिळत आहे. परिणामी, जिल्हातील १२३५ प्राथमिक शाळांपैकी केवळ ८४ आणि माध्यमिक ४२४ शाळा पैकी ३८ शाळांनी नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, एकूणच ५१ लाखांचे बक्षीस जिंकण्याबाबत शाळा अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा वाढविणे, शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे, आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे यासाठी राज्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानास ३ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. या अभियानात राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना सहभागी होण्यास आवाहन केले आहे. ४५ दिवसांचे हे अभियान आहे. या अभियानातील शाळांसाठी विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रमांसाठी एकूण १०० गुण आहेत. शाळेसाठी पहिले पारितोषिक ५१ लाख रुपयांचे असून दुसरे पारितोषिक २१ लाख आणि तिसरे ११ लाख रुपये इतके आहे. परंतु, दैनंदिन अध्यापन करुन शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती, फोटो अपलोड करण्यास शिक्षक वैतागले आहे.

या उपक्रमांची माहिती भरण्यास कंटाळा

  • वर्ग सजावट फोटो, वृक्षारोपण किंवा वृक्ष संगोपन, इमारतीची रंगरंगोटी, बोलक्या भिंती, बाल मंत्रिमंडळाचे कामकाज पाहताना, प्रधानमंत्री पोषणशक्ती योजना, परसबाग, मेरी माटी, मेरा देश, बचत बँक हे उपक्रम, नवसाक्षरता अभियान, विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती, महावाचन चळवळअंतर्गत उपक्रम, लेखन-संगीत तसेच वेगवेगळ्या स्पर्धा, एनसीसी, एमसीसी, परिसर स्वच्छता व स्वच्छता मॉनिटर, विविध क्रीडा स्पर्धा, आरोग्य तपासणी, प्रथमोपचार पेटी, विविध आजारांवर मार्गदर्शन, किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन उपक्रम, हात कसे धुवावे? याचे प्रात्यक्षिक उपक्रम, आर्थिक साक्षरता, पैसा नियोजन, बँक पोस्ट तज्ज्ञ, कौशल्यवर आधारित शिक्षणाचे महत्त्व, शाळेला कोणतीही वस्तू देणे, तंबाखू मुक्त शाळा उपक्रम, प्लास्टिक मुक्त शाळा.
Share